Chardham Yatra 2023: भाविकांची प्रतीक्षा अखेर संपली! केदारनाथ धामचे दरवाजे उघडले

25 Apr 2023 13:50:18

Kedarnath Doors Opend - Abhijeet Bharat
 
देहरादून : भाविकांची चारधाम यात्रेसाठीची दीर्घ प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक उत्सुक असताना आज मंगळवारी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले. संपूर्ण विधीविधान आणि मंत्रोच्चारांसह मंगळवारी सकाळी ६.२० वाजता केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
 
<!-- Inject Script Filtered -->
 
केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीमा शंकर लिंग शिवाचार्य यांनी यांच्या हस्ते केदारनाथ धामचे दरवाजे आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवाजे उघडल्यानंतर धाममधील पहिली पूजा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने करण्यात आली. यावेळी रावल भीमाशंकर लिंग व पुजारी शिवलिंग व धर्माचार्यांनी पूजन केले. महत्वाचे म्हणजे या शुभ प्रसंगी केदारनाथचे मंदिर तब्बल 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. केदारनाथ धाममध्ये दरवाजे उघडण्याच्या वेळी हजारो यात्रेकरू उपस्थित असून त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
 
 
<!-- Inject Script Filtered -->
 
मंगळवारी पहाटे ५ वाजल्यापासूनच केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. धार्मिक परंपरांसोबतच बाबा केदार यांची पंचमुखी भोग मूर्ती पालखीतून रावल निवास येथून मंदिर परिसरात पोहोचली. येथे भाविकांना रावल यांनी आशीर्वाद दिले. यानंतर प्रशासनाकडून रावल आणि श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. दरवाजे उघडताच महादेवाच्या जयघोषाने धाम दुमदुमून गेला. यानंतर मुख्य पुजारी शिवलिंग यांनी गर्भगृहात भगवान केदारनाथची विशेष पूजा केली आणि नंतर भाविकांसाठी यंदाचे केदारनाथचे दर्शन सुरू झाले.
 
दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथ धाममध्ये आजपासून हेली सेवा सुरू झाली आहे. केदारनाथ हेली सेवेचे बुकिंग ७ मे पर्यंत पूर्ण झाले आहे. पुढील प्रवासासाठी तिकीट बुकिंगची वेळ लवकरच निश्चित केली जाईल. गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी हेलिपॅडवरून भाविकांसाठी हेली सेवा चालवली जाणार आहे.
 
हेही वाचा : Chardham Yatra 2023: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उघडले गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे
 
 
बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिलला उघडणार
 
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर आज २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजेही उघडले आहेत. आता बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी २७ एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0