देहरादून : दरवर्षी चारधाम यात्रेला जाण्यासाठी लाखो भाविक उत्सुक असतात. कधी मंदिराचे दरवाजे उघडतील आणि कधी भगवानाचे दर्शन करून त्यांचा आशीर्वाद घेतो, यासाठी भाविक आतुरतेने वाट बघत असतात. अशातच यावर्षीच्या चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज शनिवारी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.
गंगोत्री धामचे दरवाजे आज 12.13 मिनिटांनी भाविकांसाठी उघडण्यात आले असून यमुनोत्रीचे दरवाजे 12:41 वाजता उघडले. यासोबतच केदारनाथ धाम २५ एप्रिलपासून दर्शनासाठी खुले होणार आहेत. तर दुसरीकडे २७ एप्रिलपासून बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडणार आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावेळी मंदिरात पोहोचून गंगा पूजन केले. यानंतर पूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गंगोत्री धामचे दरवाजे औपचारिकरित्या दर्शनासाठी भुले करण्यात आले. यानंतर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले. यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
तसेच राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (सेनी) यांनी आज अक्षय्य तृतीयेला गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्याच्या शुभ प्रसंगी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सर्व भाविकांना चारधाम यात्रा निर्विघ्न, आनंददायी आणि मंगलमय होवो, अशा शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, गंगोत्री धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. याअंतर्गत शुक्रवारी मुखबा येथून माँ गंगाची पालखी लष्कराच्या बँडच्या तालावर गंगोत्री धामकडे रवाना झाली. मुखबा गावातील ग्रामस्थ माता गंगेच्या निरोपाच्या वेळी भावूक झाले.
चारधाम यात्रेला शुक्रवारी औपचारिक सुरुवात झाली, तर शनिवारी दुपारी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे उघडून यात्रेची औपचारिक सुरुवात झाली.