Nagpur : कळमना परिसर हादरला! ४ वर्षीय भाचीवर मामाचा लैंगिक अत्याचार

20 Apr 2023 16:30:01
- आठवड्याभरात नागपुरातील अल्पवयीन मुलीवरील तिसरी अत्याचाराची घटना

Kalamna Police Station 

नागपूर :
गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नागपूर शहरात केवळ एका आठवड्यात तीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अत्याचार करणाऱ्या या हैवान नराधमांना आपल्या वासनेसमोर काहीच दिसत नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. अशातच शहरातील कळमना भागात एका चार वर्षीय माचीवर तिच्या मामानेच लैंगिक अत्याचार केल्याचे संतापजनक वृत्त समोर आले आहे. विष्णू भारती (वय 28) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
चार वर्षांची भाची मैत्रिणीसोबत घरी खेळत असताना तिच्या मामाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कळमना येथे ही घृणास्पद घटना उघडकीस आली. विष्णू (28) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.
 
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, तक्रारदार महिला 30 वर्षांची असून ती कळमना परिसरात भाजी विक्रीचे काम करते. दोन वर्षांपूर्वी तिचा नवरा तिला सोडून गेल्याने ती तिच्या 4 वर्षांच्या मुलीसोबत कळमना परिसरातच राहते. पोटापाण्याचा विषय असल्याने तसेच मुलीचा सांभाळ नीट करता यावा यासाठी ती पहाटे भाजी विकायला जाते. यादरम्यान ती तिच्या 4 वर्षीय मुलीला नातेवाईकाकडे सोडून जाते. आरोपी विष्णू भारती हा महिलेचा नातेवाईक आहे.
 
दरम्यान, 17 एप्रिल रोजी सकाळी ही महिला कामावर गेली असता तिची 4 वर्षांची मुलगी तिच्या 10 वर्षाच्या चुलत भावासोबत घराजवळ खेळत होती. त्यानंतर आरोपी विष्णूने तेथे पोहोचून मुलाला 20 रुपये दिले आणि दुकानात मिठाई घेण्याच्या बहाण्याने पाठवले. त्यानंतर आरोपीने 4 वर्षीय चिमुकलीला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. काही वेळाने महिला घरी पोहोचली तेव्हा तिला तिची मुलगी वेदनेने तडफडत असलेली दिसली. त्यानंतर महिलेने चिमुकलीकडे विचारपूस केली असता तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर महिलेने तातडीने पोलिसांकडे धाव घेत विष्णू विरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पॉक्सोसह विविध कलमान्वये नराधम आरोपी विष्णू भारती विरोधात गुन्हा दाखल केला.
 
संतापजनक बाब म्हणजे एकाच आठवड्यात नागपूर शहरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी लकडगंजमध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता, तर 15 एप्रिलला कोराडीमध्ये 5 वर्षीय मुलीला वासनेचे शिकार बनवण्यात आले होते. शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिन्ही प्रकरणातील आरोपी ओळखीचे होते, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0