विदर्भाचे माजी रणजी खेळाडू प्रवीण हिंगणीकर यांच्या वाहनाला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

    19-Apr-2023
Total Views |

Ex Vidarbha Ranji Captain Praveen Hinganikar
 (Image Source : tw/@PitchVisionAcad)
 
नागपूर :
प्रवास सुकर व्हावा यासाठी बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्दैवी मृत्यूंचे सत्र सुरूच आहे. अशातच क्रिकेट जगतासह संपूर्ण विदर्भाला धक्का देणारी बातमी समोर आहे आली. विदर्भाचे माजी रणजी खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे खेळपट्टीचे क्युरेटर प्रवीण हिंगणीकर (Ex Vidarbha Ranji Captain Praveen Hinganikar) यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याजवळ मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. यात प्रवीण हिंगणीकर गंभीर जखमी झाले असून त्यांची पत्नी सुवर्णा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर प्रवीण यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात इतकी भयावह होता की प्रवीण यांच्या पत्नीचे डोके शरीरापासून वेगळे झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
पोलिसांकडून या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका जोरदार होता की असून प्रवीण यांच्या क्रेटा कार (एमएच 31 एफए 6622) चा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर आणि त्यांचा पत्नी हे पुण्याहून नागपूरला येत असताना हा अपघात झाला. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याजवळ येताच समृद्धी महामार्गावरील पुलाखाली सावलीत उभ्या असलेल्या कंटेनरला प्रवीण यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. यामुळे शेजारी बसलेल्या त्यांचा पत्नीचे डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्वत: कार चालवत असलेल्या प्रवीण हिंगणीकर यांना ही गंभीर दुखापत झाली आहे.
 
अपघात झाल्यानंतर त्याचवेळी महामार्गावरून अकोला येथे जात असलेल्या परिचारिक असलेले पती-पत्नी यांनी हा अपघात पाहताच तात्काळ वाहन थांबवून प्रवीण यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांना प्रथम मेहकर ग्रामीण रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंगणीकर यांना यापूर्वी हात व पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली होती. तर दुसरीकडे हिंगणीकर यांचा अपघात आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.