Gudi Padwa 2023 : समृद्धीची गुढी उभारू या!

    22-Mar-2023
Total Views |

gudi padwa(Image Source : Internet) 
हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अधिक महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदे पासून मराठी नववर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी (यंदा बुधवार : २२ मार्च २०२३; गुढी पूजनाचा मुहूर्त सकाळी ६ वाजून २९ मिनिटं ते सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असणार आहे.) साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून यंदाचा पाडवा एच३एन२ सोबतच कोरोनाचे वाढते नवीन रुग्ण, उन्हाळा, पाणी टंचाई, कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आदी संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने हे जग निर्मिले असे मानले जाते तर रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच रामाने अयोध्येत प्रवेश केला.
 
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाची पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो. दारासमोर रांगोळी घालून गुढी उभी केली जाते. आरोग्याच्या दृष्टीनेही गुढी पाडव्याचे खूप महत्व आहे. हिवाळ्याचा आल्हाददायक काळ संपून जिवाची काहिली करणारा उन्हाळा सुरू झाल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. केले जाते. सुवर्ण खरेदी हा त्यातलाच एक भाग. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचे, पावित्र्याचे, समृद्धीचे व चैतन्याचे प्रतीक आहे. तथापि, आनंद आणि चैतन्याचा हा सण यंदा अत्यंत सावधपणाने साजरा करताना कोरोनाबाबतीत शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून, जुने बुरसटलेले विचार, अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा नष्ट करणारी गुढी उभारू या. संपूर्ण भारत आणि जग कोरोनामुक्त व्हावे, अशी प्रार्थना करू या.
 
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७ 

 
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.