पंजाबमध्ये सर्च ऑपरेशन

    21-Mar-2023
Total Views |

Khalistan
(Image Source : Internet)
 
चार दशकांपूर्वी ज्या खलिस्तानवाद्यांनी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते, ज्यांनी भारताच्या एका महान पंतप्रधानांची आणि पंजाबच्या काही मुख्यमंत्र्यांची हत्या केली ते खलिस्तानचे भूत पुन्हा एकदा भारताच्या मानगुटीवर बसण्याच्या प्रयत्न करत आहे. चार दशकांपूर्वी जर्नलसिंग भिंद्रणवाले यांनी स्वतंत्र खलिस्तानसाठी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते, आता तेच काम वारीस दे पंजाब ही संघटना करत आहे.
 
वारीस दे पंजाब ही संघटना खलिस्थान समर्थक असून या संघटनेला परदेशातून पाठबळ मिळत आहे अर्थात खलिस्तानवाद्यांना परदेशातून पाठबळ मिळणे ही नवी बाब नाही. चार दशकांपूर्वी जेव्हा खलिस्तान चळवळीने मोठ्या प्रमाणात जोर धरला होता तेव्हाही त्या संघटनेला पाकिस्तानातून पाठबळ मिळत होते. इतकेच नाही तर कॅनडा आणि ब्रिटनमध्येही खलिस्तान समर्थकांची मोठी संख्या होती. कॅनडाच्या सरकारमधील अनेक मंत्री खलिस्तान समर्थक होते त्यांनी त्या काळात भिंद्रणवाले याला आर्थिक मदत केल्याचे पुरावे भारत सरकारने उघड केले होते.
 
आताही अमृतपाल सिंग याच्या संघटनेस विदेशातून पाठबळ मिळत आहे हे उघड आहे जर अमृतपाल सिंगवर वेळीच कारवाई केली नाही तर चार दशकांपूर्वीचे खलिस्तानचे भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसेल त्यामुळे अमृतपाल सिंगवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत होती. अखेर सरकारने अमृतपाल सिंगवर कारवाई करण्याचे ठरवले त्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. शनिवारी अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पोलिसांनी कॉम्बिन्ग ऑपरेशन केले मात्र अमृतपाल सिंग पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला. त्याची कार नकोदर येथे उभी असल्याचे आढळून आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंगचा मोबाईल याच कारमध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कॉम्बिन्ग ऑपरेशनमध्ये अमृतपाल सिंग जरी पोलिसांच्या हाती लागला नसला तरी अमृतपाल सिंगच्या वारीस दे पंजाब संघटनेच्या ७८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
 
पोलिसांच्या कारवाई नंतर पंजाबमधील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. अफवा पसरू नये यासाठी पंजाबमध्ये २० तारखेपर्यंत नेट बंदी करण्यात आली आहे. सरकारने इंटरनेट सेवा बंद करताना बल्क मेसेजवर देखील बंदी घातली होती. तसेच सोमवारी व मंगळवारी पंजाबमधील शासकीय बससेवा देखील बंद राहील. अमृतपाल सिंगच्या समर्थकांकडून तोडफोड होण्याची शक्यता लक्षात घेऊन बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.
 
शनिवारी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंग भटिन्डा आणि जालंधर येथे एका कार्यक्रमासाठी येणार होता. जालंधरच्या मेहतपुर येथे अमृतपाल सिंगचा ताफा येताच पोलिसांनी घेराव घातला. ताफ्यातून पुढे धावणाऱ्या दोन वाहनातून प्रवास करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक करताच तिसऱ्या गाडीत बसलेला अमृतपाल सिंग हा तेथून पळाला. तो आणि त्याच्या गाडीचा चालक गाडी तेथेच सोडून पळून गेले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. आता जरी तो पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी त्याला जेरबंद करण्यात पंजाब पोलीस यशस्वी होतील असे मत जालंधरच्या पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले असून हे सर्च ऑपरेशन यापुढेही कायम राहणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.