अद्वितीय शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन

    20-Mar-2023
Total Views |

Unique Scientist Sir Isaac Newton
 (Image Source : Internet)
 
 
जगाच्या पाठीवर आजवर अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ (Scientist) होवून गेले, ज्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक महत्वपूर्ण शोध लावले. त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बळावरच आज आपण आधुनिक जगात सुखाने वावरत आहोत. महान इंग्रज शास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोल प्रेमी, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि प्रकाशकी अशी बहुआयामी ख्याती मिळवणारे प्रसिद्ध वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन (Isaac Newton) यांच्या २० मार्च या स्मृतिदिना निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
 
सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म ४ जानेवारी १६४३ रोजी म्हणजे ज्या वर्षी महान संशोधक गॅलिलिओ मरण पावला त्याच वर्षी इंग्लंडमधील वूलस्थॉर्प मध्ये झाला. प्राचीन ज्युलियन कॅलेंडरचा उपयोग करता, न्यूटनची जन्मतिथी २५ डिसेंबर १६४२ म्हणूनही वापरली जाते. त्याचे शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झाले. तेथेच त्याची १६६९ साली गणितशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. गणितशास्त्र, गुरुत्वाकर्षण, गतिशास्त्र, प्रकाश, दृकशास्त्र इ. क्षेत्रात न्यूटनने संशोधन करून महत्वाचे सिद्धांत मांडले.
 
१. गणितशास्त्र : न्यूटन एक श्रेष्ठ गणिती होता. गणितशास्त्रामधील शून्यलब्धी चा शोध त्याने लावला. (कॅलक्य़ुलसचा शोध भास्कराचार्यांनी लावला. या शास्त्राला ते शून्यलब्धि म्हणत असत. म्हणजे शून्याच्या जवळ पोचणार्‍या संख्याफलांचे गणित). सर्वंकष स्वरूपातला बायनॉमियल थिरम ज्याच्या आधारे 'क्ष' अधिक 'य' अशा दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग, घन इत्यादी घातांकाचे मूल्य काढता येते.
 
२. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत : कोपरनिकस, गॅलिलिओ आणि केपलर या शास्त्रज्ञांनी सूर्य आणि ग्रह यांच्या आकाशातील भ्रमणाचे सूक्ष्म निरीक्षण करून सूर्यमालेची कल्पना मांडली होती. तथापि, न्यूटनने सखोल अभ्यास करून त्याला गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची जोड देऊन ते गणिताने सिद्ध केले. विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले. त्यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असा, “विश्वामधील प्रत्येक वस्तूत दुसऱ्या वस्तूला आकर्षित करण्याची शक्ती असते. ही शक्ती म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती. ही शक्ती वस्तूचे वस्तुमान आणि वस्तू-वस्तूमधील अंतर यावर अवलंबून असते.
३. गतिशास्त्र : न्यूटन ने गतिविषयक तीन महत्वाचे नियम मांडले.
१. कोणतीही वस्तू आपली स्थिती आपोआप बदलत नाही. ती गतिमान होण्यास बाह्यप्रेरणेची आवश्यकता असते. गतीमान वस्तूची गती बाह्यप्रेरणेने न थांबवल्यास ती वस्तू सरळ रेषेत आपली गती कायम ठेवते.
२. जेव्हा एखाद्या वस्तूवर एखादे बल (प्रेरणा) कार्य करते तेव्हा ते त्या वस्तूची गती बदलते आणि हा बदल प्रेरणा जेवढा वेळ कार्य करते त्या वेळेच्या प्रमाणात व प्रेरणेच्या दिशेने होतो.
३. प्रत्येक क्रियेस प्रतिक्रिया असते. क्रिया आणि प्रतिक्रिया समान पण विरुद्ध दिशेने होत असतात.
४. प्रकाशकी (ऑप्टिक्स) : पांढऱ्या शुभ्र सूर्यप्रकाशाचा किरण लोलकातून घालविल्यास त्यात सात रंग असतात हा सिद्धांत त्याने मांडला. रंगीत वस्तू विशिष्ट रंगाचे प्रकाशकिरण जास्त प्रमाणात परावर्तित करत असतात. तो पदार्थ आणि त्यावर पडणारे प्रकाशकिरण या दोन्हींच्या संयोगाने त्याचा रंग ठरतो. याला न्यूटनचा ‘रंगाचा सिद्धांत’ असे म्हणतात.
५. दृकशास्त्र : न्यूटनने अधिक कार्यक्षम दूरदर्शक (दुर्बीण) बनविण्यासाठी संशोधन केले. लिलिओ च्या दूरदर्शकातून प्रतिमा रंगीत दिसत. न्यूटनने अंतर्गोल बसविलेला परावर्तिनी दूरदर्शक बनवला, त्यामुळे प्रतिमेचे रंग नाहीसे होऊन प्रतिमा अधिक स्पष्ट दिसू लागली.
६. ग्रंथसंपदा : न्यूटचा सर्वात गाजलेला ग्रंथ म्हणजे मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी १६८७ साली प्रथम प्रकाशित झाला. त्यानंतर या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या व त्यावरील टीकाग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. या ग्रंथामध्ये गतिशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र आदी शास्त्रांची चिकीत्सा केली आहे. आधुनिक विज्ञानाच्या विकासाला या ग्रंथापासूनच सुरुवात झाली असे मानण्यात येते. ऑप्टिक्स (Opticks)हा न्यूटनचा दुसरा महत्वाचा ग्रंथ होय. हा प्रकाशकी वर अवलंबून आहे.
ज्यांच्या शास्त्रीय संशोधनामुळे विज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड वेग मिळाला आणि त्यामुळे जगाच्या इतिहासावर किंवा मानवजातीच्या जीवनावर परिणाम करणारी औद्योगिक क्रांती सुरू झाली. अशा वैज्ञानिकांमध्ये अजूनही न्यूटनचाच पहिला क्रमांक लागतो. १७०५ मध्ये अ‍ॅन राणीने त्यांना नाईट (सर) हा किताब दिला. ते २० मार्च (३१ मार्च)१७२७ साली लंडन येथे मृत्यू पावले.

प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, सांगली
९४२३८२९११७
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.