लंडनमध्ये तिरंग्याच्या अपमानामुळे लोक संतप्त; शीख समुदायाची दिल्लीत निदर्शने

    20-Mar-2023
Total Views |
 
Khalistani protestors pulls down Tricolour in UK
 (Image Source : Twitter)
 
नवी दिल्ली :
प्रत्येक भारतीयाचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाचा (Indian Flag) लंडनमध्ये रविवारी अपमान करण्यात आला. खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांनी रविवारी भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय ध्वज खाली पाडला. त्यांच्या या कृत्यामुळे अनेक लोकांमध्ये क्रोधाची लाट उफाळून आली असून शीख समुदायात या घटनेवरून प्रचंड नाराजी दिसून येत आहे. शीख समुदायातील अनेक लोकांनी सोमवारी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर एकत्र येऊन तिरंग्याला खाली पडण्याच्या घटनेचा तीव्र विरोध करत निदर्शने केली.
 
दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर सोमवारी निदर्शने करत असलेल्या लोकांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. तसेच भारत आमचा स्वाभिमान आहे असे सांगत राष्ट्रीय ध्वजाचा अपमान खपवून घेणार नाही असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठे योगदान आमचे होते आणि आजही आम्ही भारताचे रहिवासी आहोत. आमचे भारतावर प्रेम आहे. या देशासाठी आम्ही प्राणही देऊ. लंडनमध्ये जे काही घडले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे आंदोलकांनी सांगितले.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची घटनेवर प्रतिक्रिया
लंडनमध्ये तिरंग्याच्या अपमानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही आपला आक्षेप नोंदवला आहे. सोमवारी परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात झालेल्या तोडफोडीवर सांगितले की, आम्ही यावर भारताची प्रतिक्रिया दिली आहे. गुन्हेगारांना पकडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यूके उच्चायुक्तालयात सुरक्षा व्यवस्थेची गरज आम्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचित केली आहे.
दरम्यान, लंडनमधील हे आंदोलक वारीस दे पंजाब या खलिस्थान समर्थक संघटना आणि त्याचा स्वयंघोषित प्रमुख अमृतपाल सिंग यांच्यावर पंजाबमधील सुरक्षा दलाच्या कारवाईविरोधात निदर्शने करत होते. अशात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक खलिस्तान समर्थक घोषणा देत भारतीय राष्ट्रध्वज खाली खेचताना दिसत आहेत. वृत्तानुसार, आंदोलकांनी कॅम्पसमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.