मानव मुक्तीचा सत्याग्रह

    20-Mar-2023
Total Views |

satyagraha for human liberation
(Image Source : tw/@jigneshmevani80)
 
 
Satyagraha for Human Liberation : २० मार्च हा दिवस भारताच्या सामाजिक इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे. कारण याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून सत्याग्रह (Satyagraha) केला. हा महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा मानव मुक्तीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. म्हणूनच २० मार्च हा दिवस भारतात सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा सत्याग्रह फक्त महाराष्ट्रालाच नाही तर जगाला प्रेरणा देणारा ठरला.
 
पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तिच्यावर सर्वांचा समान हक्क असताना त्या काळच्या जातीय व्यवस्थेने मुख्य स्रोतातून पाणी घेण्यास व रस्त्यावरुन जाण्यासही अस्पृश्यांना बंदी घातली. ४ ऑगस्ट १९२३ साली ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी के बोले यांनी मुंबई कायदे मंडळात एक कायदा पास करुन घेतला. त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या व सुस्थितीत असलेल्या मालमत्तेवर म्हणजे पाणवठे, धर्मशाळा, बगीचे यावर सर्वांचाच म्हणजे अस्पृश्यांचा देखील अधिकार असेल. जानेवारी १९२४ साली महाडच्या नगरपालिकेने या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव केला. या ठरावानुसार नगरपालिकेने महाडचे चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केल्याचे जाहीर केले.
 
परंतु, स्पृश्यांनी अस्पृश्यांना या तळ्यातून पाणी भरू दिले नाही. त्यामुळे अस्पृश्यांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करू देण्यासाठी व त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरवले. बाबासाहेबांनी १९ आणि २० मार्च या दिवशी महाडमधील कुलाबा येथे परिषद भरवली. या परिषदेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब हे होते. या परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे हे दलितेतर व ब्राह्मण नेते उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करुन काही ठराव करण्यात आले ते असे
१. स्पृश्यांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे.
२. स्पृश्य लोकांनी अस्पृश्य लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार मान्य करावेत.
३. मृत जनावरे ज्याची त्याने ओढवित
४. स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.
 
याच परिषदेत असेही ठरले की सर्वांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २० मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी प्यावे. त्यानुसार दुसऱ्या दिवशी परिषदेस उपस्थित असणारे सर्व नेते व परिषदेस आलेले सर्व जण चवदार तळ्यावर गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम या तळ्यातील पाणी ओंजळीने प्यायले. त्यावेळी स्त्री पुरुष ५००० लोक या परिषदेस व त्यानंतर चवदार तळ्यावर पाणी पिण्यासाठी आले. त्यातील पुरुष हे हातात काठी घेऊन आले होते. हातात काठी म्हणजे महार जातीच्या पुरुषाचे चिन्ह होते. चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला. पण, ही मानवतावादी घटना रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी बंगल्यात परत गेल्यावर जातीयवादी, सनातनी विचारांच्या लोकांनी गावात अफवा उठवली की, चवदार तळे बाटवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील जमाव विश्वेवश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहेत.
 
धर्म धोक्यात आल्याचे उच्चवर्णीय, सनातनी हिंदूंनी गावभर पसरवले, त्यातून जातीयवादी उच्च हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्याकाठ्या घेऊन सभास्थानी आला. त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करीत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. त्यांच्या जेवणात माती मिसळली. विश्वेवश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्यामुळे गावातील सनातनी हिंदूंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु, अहिंसा हे तत्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनानती हिंदूंविरुद्ध हिंसा करु नका असा आदेश दिला होता, त्यामुळे एव्हढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिकांपेक्षा संख्येने जास्त असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम बाळगला.
 
अस्पृश्यांनी तळे बाटवले म्हणून सनातनी, जातीयवादी हिंदूंनी गोमूत्र टाकून ब्राह्मणांकडून तळ्याचे शुद्धीकरण करुन घेतले. पुढे महाडच्या नगरपालिकेने स्थानिकांच्या दबावाला बळी पडून अस्पृश्यांना चवदार तळे खुले करण्याचा ठरावही रद्द केला. त्यामुळे बाबासाहेबांनी २५ आणि २६ डिसेंबर रोजी रोजी महाड येथे परिषद घेण्याचे ठरवले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, आतापर्यंत आम्ही या तळ्याचे पाणी पिऊ शकलो नाही किंबहुना आम्हाला पिऊ दिले नाही, आता आम्ही या तळ्याचे पाणी प्यायलो म्हणजे आमचे सर्व दुःख नष्ट होईल, आमची सर्व परिस्थिती सुधारेल, आमच्यावरील अन्याय कमी होईल असे काही नाही. हा सत्याग्रह म्हणजे केवळ एका मानवाने दुसऱ्या मानवाला समानतेने कसे वागवावे हे सांगण्याचा व सर्व मानवाला समानतेचा अधिकार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी जगाच्या पाठीवर पिण्याच्या पाण्यासाठी केलेला हा एकमेव सत्याग्रह आहे म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह मानव मुक्तीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
 
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.