सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड

    19-Mar-2023
Total Views |

Bhalchandra Kulkarni
 (Image Source : Internet)
 
 
सच्चा रंगकर्मी, संपन्न नाट्यकर्मी, लोककलेचा अभ्यासक आणि आदर्श शिक्षक अशी ओळख असलेले जेष्ठ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक भालचंद्र कुलकर्णी (bhalchandra kulkarni) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गेली पाच दशके रंगभूमीची सेवा करणारा सच्चा रंगकर्मी काळाच्या पडद्याआड गेला आहे.
 
भालचंद्र कुलकर्णी यांनी जवळपास ३०० मराठी चित्रपटात काम केले. त्यांनी चित्रपटात भ्रष्टाचारी राजकारणी, स्वार्थी सरपंच, गावचा पाटील, करारी बाप, अगतिक सासरा अशा भूमिका वठवल्या. त्यांनी त्यांच्या भूमिकेद्वारे मराठी चित्रपटात गावरान बोलीभाषा, ग्रामीण परंपरा व संस्कृती जपली. ते चित्रपटात कायम फेटा बांधत असत. ३०० चित्रपटात भूमिका करूनही त्यांनी ग्रामीण साहित्य आणि लोककलेचा ध्यास सोडला नाही. विलासपूची रंभा, हवालदार, भोळा बाईवर डोळा, तुम्हांवर केली मी मर्जी बहाल ही त्यांनी केलेली लोकनाट्ये त्या काळात खूप गाजली. देवमाणूस, मी उभा आहे, काचेचं घर, लग्नाची बेडी या नाटकात त्यांनी काम केले.
 
उमेदीच्या काळात त्यांनी संगीत नाटकातही भूमिका केल्या. बाळ शिबाजी, आंधळा मारतो डोळा, धुमधडाका, सुशीला, एक गाव बारा भानगडी, गणगवळण, माहेरची साडी, पिंजरा, सुगंधी कट्टा, थरथराट या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या. अभिनयासोबतच निर्मिती, दिगदर्शन व लेखन या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली. मराठी चित्रपट सृष्टीचे किमयागार, चित्रपुरीचे मानकरी, या प्रेमाची शपथ तुला यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांनी एकपात्री प्रयोगही केले. दूरचित्रवाणीवरील मालिकांतही त्यांनी भूमिका केल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज मालिकेत त्यांनी केलेली भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जेष्ठ रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
 
 

श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
 

*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.