'मराठी पाऊल पडते पुढे' ने जागवला मराठी अभिमान

19 Mar 2023 15:29:28

- 'रंग मराठी मातीचा' संगीतमय कार्यक्रमात वैविध्यपूर्ण मराठी गीतांची बहारदार प्रस्तुती

shbd svarotsav musical program
 
 
नागपूर : 
'जयोस्तुते जयोस्तुते' या गीताच्या उर्जायुक्त प्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली. पुढे देखील तिच ऊर्जा कायम ठेवत 'रंग मराठी मातीचा' या संगीतमय कार्यक्रमात 'मराठी पाऊल पडते पुढे', नेमजसि ने, 'हे हिंदू शक्ती' या देशभक्तीपर मराठमोळ्या गीतांनी मराठी अभिमान जागवला. जागो जानो जियो क्लब, स्वरस्नेही आणि बी.आर. ए. मुंडले इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे गुडीपाडव्यानिमित्त द्विदिवसीय 'शब्द -स्वरोत्सव'च्या दुसऱ्या दिवशी देशभक्तीपर मराठमोळ्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
सुरभी ढोमणे यांनी 'मोगरा फुलला', 'हे हिंदू शक्ती', 'असा बेभान हा वारा', 'सुन्या सुन्या मैफिलीत' आणि लावणी मेडलि सादर केली. अमर कुलकर्णी यांनी 'हा रंग मराठी मातीचा' हा पोवाडा, 'लाजून हासणे', 'मनाच्या धुंदीत' या गीतांवर रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. तर मंजिरी वैद्य-अय्यर यांनी शतकांच्या यज्ञातून, 'ऋतू हिरवा' आणि नाट्यपद सादर केले. ऋषिकेश करमरकर यांनी 'तेजोनिधी', 'मुरलीधर श्याम', 'लल्लाटी भंडार' अशी वैविध्यपूर्ण गीते गायली. याशिवाय 'वल्लव रे नाखवा' हे कोळी गीत, 'नेमजसि ने आणि 'मराठी पाऊल पडते पुढे' समूह गीत, देवीचा गोंधळ, गीत रामायण मेडलि अशी अप्रतिम सादरीकरणे यावेळी झाली.
शिवराज्याभिषेक गीत गाताना गायकांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी देखील साथ दिली.
 
या कार्यक्रमात संगीत नियोजन आनंद मास्टे यांचे होते तर वादक अशोक टोकलवार, अमर शेंडे, अक्षय हरळे हे होते. कार्यक्रमाचे निवेदन मुकुंद देशपांडे आणि मृण्मयी कुलकर्णी यांनी केले. मंच सज्जा राजेश अमीन यांची होतो तर ध्वनी नियोजन शंकर लिंगे यांचे होते.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
Powered By Sangraha 9.0