कार चालकाने भरचौकात केली महिलेला मारहाण; जाणून घ्या काय आहे प्रकरण

    18-Mar-2023
Total Views |
 
- ओव्हरटेक करण्यावरून वाद; व्हिडिओ व्हायरल

car driver assaults woman
 (Image Source : Abhijeet Bharat)
 
नागपूर :
गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहे. सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेल्या आजच्या स्त्रीचा भरचौकात अपमान (car driver assaults woman) होणे, ही संतापजनक बाब आहे. अशीच काहीशी घटना नागपूरातील जरीपटका भागात घडली. गाडी ओव्हरटेक करण्याच्या वादावरून एका कार चालकाने एका महिलेला भर चौकात मारहाण केली आहे. या प्रकरणानंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
जरीपटका पोलिस ठाण्यातर्गत कारला ओव्हरटेक करण्यावरून महिला आणि कार चालकामध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी कार चालकाने महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तसेच एखादा माणूस इतका असंवेदनशील आणि असहिष्णू कसा होऊ शकतो असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिवशंकर कारने इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. यावेळी मागून दुचाकीवरून येणाऱ्या एका महिलेने त्याला ओव्हरटेक केले. महिलेच्या पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीवरून उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली. दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली. लोकांनी मोठा जोर लावून आरोपीला दूर करत महिलेला वाचवले.
 
घटनेनंतर पीडित महिलेने जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपी शिवशंकर श्रीवास्तव याच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अटक केली आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.