बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; महाआघाडीचे आमदार भोपळा घेऊन उतरले विधानभवनाच्या पायर्‍यांवर

    10-Mar-2023
Total Views |
 
maha aghadi mlas
(Image Source : Internet)
 
मुंबई :
उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक विविध क्षेत्रातील विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींची घोषणा केली. मात्र अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर विरोधकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. यावेळी विरोधकांच्या घोषणांमुळे विधानभवनाचा परिसर दणाणून उठला.
 
बजेटमध्ये मिळाला भोपळा... महाराष्ट्राला मिळाला भोपळा... बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा...बजेट म्हणजे रिकामा खोका... सर्वसामान्यांना मिळाला भोपळा... सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके... अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे-सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.