(Image Source : Internet)
पुणे :
भारताच्या पहिल्या माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (pratibha patil) यांचे पती डॉ. देवीसिंह शेखावत (dr sevisingh shekhawat) यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. कुटुंबियांच्या जवळच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. देवीसिंह शेखावत यांची तब्बेत खालावल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. पुण्यात आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या पश्चात पत्नी प्रतिभाताई पाटील आणि एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल माझ्या संवेदना आमच्या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांसह आहे. आपल्या विविध समाजसेवेच्या प्रयत्नातून डॉ. देवीसिंह शेखावत यांनी समाजावर ठसा उमटवला. ओम शांती.'
याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू डॉ. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हणाल्या, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती डॉ. देवीसिंह शेखावत यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून दुःख झाले. राजकीय कारकीर्द असलेले शिक्षणतज्ज्ञ डॉ. शेखावत यांनी लोकहितासाठी दिलेल्या योगदानासाठी स्मरणात राहतील. प्रतिभा पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना.'
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.