(Image Source : Internet/ Representative)
Water Pollution : देशातील अनेक शहरांना प्रदूषणाने विळखा घातला आहे. दिल्लीसारख्या देशाची राजधानी असलेल्या शहराची प्रदूषणाने काय अवस्था झाली ते आपण पाहिलेच आहे आता देशाची आर्थिक राजधानी आणि आपल्या राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची अवस्थाही दिल्लीसरखीच होताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरात मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबईची हवा प्रदूषणाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. औद्योगिकीकरण व वाढत्या प्रदूषणामुळे हवेत विषारी वायू मिसळला जात आहे. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले. हवा पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. पण मानवाने मात्र या देणगीचा आदर करण्याऐवजी त्यात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच प्रदूषणासारखी भीषण समस्या आज निर्माण झाली आहे. केवळ वायू प्रदूषण हीच आजची एकमेव समस्या नाही, तर जलप्रदूषण (water pollution) ही देखील वायू प्रदूषणाइतकीच गंभीर समस्या बनली आहे.
जगात सर्वात जास्त मृत्यू हे दूषित पाण्यामुळे होत आहे. संपूर्ण जगात १८० कोटी लोक दूषित पाणी पितात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात ९ कोटीहून अधिक लोक दूषित पाणी पिल्यामुळे आजारी पडतात. ग्रामीण भागातील ७० टक्के लोक दूषित पाणी पितात, त्यामुळे ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दूषित पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मणक्याचे आजार होतात. हाडे ठिसूळ होतात. दात पिवळे पडतात. गॅस्ट्रो, हगवण, टायफॉईड, कावीळ यासारखे आजार उद्भवतात.
जलप्रदूषणाचा (water pollution) धोका फक्त मानवालाच आहे असे नाही. जलप्रदूषणाचा धोका जलचरांना देखील आहे. प्रदूषित पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जलचरांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. एकूणच जलप्रदूषणामुळे जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. असे असूनही जलप्रदूषण कमी करण्यासाठी आपण गंभीर नाही, असेच म्हणावे लागेल. कारण राज्यातील सर्वच नद्या प्रदूषणाच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, देशातील २८९ नद्या ३११ ठिकाणांवर पोहोचल्यानंतर प्रदूषित होतात. हा अहवाल अलीकडेच संसदेत सादर करण्यात आला आहे. हा अहवाल चिंताजनक आहे. कारण या अहवालानुसार देशातील सर्वच प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या प्रदूषित (water pollution) झाल्या असून त्यांचे पाणी पिण्यालायक राहिले नसल्याचे या अहवालात नमूद केले आहे. नमामी गंगा योजना आणि नदी संवर्धन योजनेमुळे नद्यांमधील प्रदूषण रोखण्यास मदत झाली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हा अहवाल मात्र सरकारचे हे म्हणणे खोडून काढतो. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या नद्या प्रदूषणाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
प्रदूषण महामंडळाने मागील वर्षी असाच एक अहवाल सादर केला होता. त्यानुसार मुंबईतील मिठी व उल्हास या नद्या सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून गणल्या गेल्या आहेत. विदर्भातील वैनगंगा, पैनगंगा, वर्धा या मोठ्या नद्यांसह वेण्णा, कन्हान नद्यांचाही प्रदूषित नद्यांमध्ये (water pollution) समावेश आहे. मध्यप्रदेशात उगम पावलेल्या वैनगंगा नदीचा तुमसर ते आष्टी पर्यंतचा ७०७ किमीचा परिसर अतिप्रदूषित म्हणून गणला गेला आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांचाही सामावेश आहे. या जिल्ह्यातील दुधुस ते राजुरापर्यंतचा ५१ किलोमीटर पर्यंतचा विस्तार प्रदूषणाच्या उच्च श्रेणीत आहे. कन्हान नदीचा नागपूर ते भंडारा पर्यंतचा १०१ किलोमीटरचा विस्तार अतिप्रदूषित श्रेणीत आहे. वेण्णा नदीही त्याच श्रेणीत असल्याचे दिसते. याशिवाय भीमा, कृष्णा, गोदावरी या मोठ्या आणि महत्वाच्या नद्या देखील प्रदूषित (water pollution) आहेत. वारी निमित्त राज्यातील लाखो वारकरी पंढरपुरात न चुकता येतात आणि चंद्रभागेत न चुकता स्नान करतात. पण आता चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणूनच काय तर स्नान करण्यासही धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रभागा नदीच्या पाण्यात घाण, कचरा, शेवाळ, अळ्या, किडे आहेत तसेच ते पाणी मैला मिश्रित असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
प्रदूषणामुळे देशातील नद्यांचे पाणी पिण्यालायक राहिले नाही. प्रदूषणामुळे केवळ मानावाच्याच नव्हे तर जलचरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अर्थात याला आपणच जबाबदार आहोत. नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरातील केरकचरा, सांडपाणी, कारखान्यातील रसायन मिश्रित दूषित पाणी, सतत होणारा वाळू उपसा यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नद्यांचे हे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. जे कारखाने आपल्या कारखान्यांमधून नद्यांमध्ये दूषित पाणी सोडत असतील त्यांचे परवाने रद्द करायला हवेत. वाळू उपसा थांबवायला हवा. जनतेनेही नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये. जलप्रदूषण (water pollution) रोखायची जबाबदारी जितकी सरकारची आहे, तितकीच ती जनतेचीही आहे. जल है तो कल है... या उक्तीप्रमाणे येणाऱ्या पिढीचे आणि जीवसृष्टीचे रक्षण करायचे असेल तर जलप्रदूषण रोखायलाच हवे.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.