(Image Source : Internet)
१ फेब्रुवारी म्हणजे भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला (First Female Astronaut Kalpana Chawla) यांचा स्मृतिदिन. २० वर्षापूर्वी त्यांच्या कोलंबिया या यानाला पृथ्वीवर परत येत असताना अपघात होऊन त्यात त्यांचा दुर्दवी मृत्यू झाला. त्यांच्या सोबत सहा अंतराळवीरांचा चमू देखील होता त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी अंत झाला. कल्पना या अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या . त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला तर आईचे नाव संयोगीता असे होते. त्यांच्या वडिलांचा औद्योगिक वस्तू निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई गृहिणी होती. कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण टागोर बाल निकेतन या विद्यालयात झाले. अभ्यासात हुशार असणाऱ्या कल्पना चावला (First Female Astronaut Kalpana Chawla) यांनी १९८२ साली पंजाब विद्यापीठातून एरोनिटीकल अभियांत्रिकी पदवी मिळवली. त्यांनी १९८४ साली अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनिटीकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८ साली डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
त्यांचे (First Female Astronaut Kalpana Chawla) अंतराळवीर होण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी त्या नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेत भरती झाल्या. १९८८ मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओव्हरसेट मेथडसच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तिथे त्यांनी कॉम्प्युटीशनल फ्ल्यूईड डायनॅमिकमध्ये जागेवरच उभे उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले. त्यानंतर त्यांना ग्लायडर्स, सील्पेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने याच्या व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला. १९९१ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. नागरिकत्व मिळाल्यावर त्यांनी १९९५ साली नासामध्ये अस्ट्रोनोट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला. त्यांना त्यासाठी नासाने त्यांना प्रवेशही दिला. त्यांची मार्च १९९६ मध्ये पहिल्या उड्डाणासाठी निवड झाली. त्यांची पहिली अंतराळ मोहीम १९ नोव्हेंबर १९९७ रोजी चालू झाली. त्यांनी अंतराळात १०.६७ दशलक्ष किमी प्रवास केला. हे अंतर २५२ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याऐवढे होते.
कल्पना चावला (First Female Astronaut Kalpana Chawla) यांना २००० साली त्यांच्या दुसऱ्या उड्डाणासाठी एसटीएस १०७ साठी देखील निवड झाली परंतु ही मोहीम तांत्रिक अडचणीमुळे लांबली जात होती. त्या १६ जानेवारी २००३ रोजी एसटीएस १०७ मोहिमेसाठी जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या. या मोहिमेत कल्पना चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमुला ८० प्रयोग करावयाचे होते त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिती अंतरळवीरांचे आरोग्य आणि सुरक्षा या विषयांचा समावेश होता. आपली मोहीम फत्ते करून १ फेब्रुवारी २००३ रोजी हे अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना आणि जमिनीवर उतरताना दुर्दवी अपघात झाला. या दुर्दवी अपघातात कल्पना चावला आणि त्यांच्या चमुचा दुर्दैवी अंत झाला.
त्यांच्या (First Female Astronaut Kalpana Chawla) मृत्यूनंतर जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांना मरणोत्तर कॉंग्रेशनल स्पेस सेवा पदक, नासा स्पेस फ्लाईट तसेच नासा विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले. जगभरातील विविध विद्यापीठांनी त्यांच्या नावे विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या जाहीर केल्या. ५ फेब्रुवारी २००३ साली भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना १ हे नाव दिले. त्यानंतर सोडण्यात आलेल्या उपग्रहालाही कल्पना २ हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार, कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरू केले. नासाने सुपर कॉम्प्युटरला कल्पना चावला यांचे नाव दिले. कल्पना चावला यांनी आपल्या धैर्य, चिकाटी, जिद्द आणि बलिदानाने देशाचे नाव उज्ज्वल केले. कल्पना चावला (First Female Astronaut Kalpana Chawla) या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या स्मृती आजही आपल्या मनात कायम आहे. कल्पना चावला यांचे कार्य आजच्याच नाही तर येणाऱ्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.