- चांडक टॉवरमधील रहिवाशांना मनपाची पुन्हा नोटीस
अमरावती : हमालपूरा रोडवरील चांडक टॉवर नामक इमारतीतील रहिवाशांना अमरावती महापालिकेतर्फे सोमवारी दुसरी नोटीस जारी करण्यात आली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून, त्याचा अहवाल सादर करावा, असे महापालिकेकडून रहिवाशांना सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे इमारत रहिवाशांसाठी खुली करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
अमरावती शहरात पाच, दहा, पंधरापेक्षा अधिक वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीत आहेत. महापालिकेकडून कालबाह्य झालेल्या इमारतींना नोटीस बजावून त्या इमारती खाली करण्याचे सुचित सुध्दा करण्यात आले आहे. परंतू तरीदेखील आजही अनेक रहिवासी शिकस्त इमारतीत राहत आहे. अशातच पाच वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या चांडक टावरच्या इमारतीतील एका पिल्लरला तडा गेल्याने महापालिकेकडून इमारत मालकांना स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे शहरातील अशा अनेक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असल्याचे या निमीत्ताने पुढे आले आहे.
रहिवाशांच्या टाहो
महापालिकेने चांडक टावरच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला कुलुप ठोकून रहिवाशांना स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात नोटीस बजावली आहे. परंतू चांडक टावरच्या पिल्लरला तडा गेल्यानंतर तेथील रहिवाशांनी धावपळ करीत आपले घर खाली केले. चिमुकल्या मुलांसह महिला, वयोवृध्द व पुरुषांना आपले घर अचानक सोडावे लागले. त्यामुळे त्यांच्या संसारीक जिवनावर मोठा परिणाम झाला आहे. लाखो रुपये खर्च करून घेतलेला फ्लॅट अचानक सोडावा लागल्यामुळे आपले सर्वस्व गेले की काय? अशी चिंता रहिवाशांना वाटु लागली आहे. घर खाली करताना एकही साहित्य सोबत घेतले नाही, महिला, पुरुषांसह त्यांच्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्यदेखील घरातच अडकले. त्यामुळे आम्हाला एकदा तरी घरी जाऊन मुलांचे शैक्षणिक साहित्य परत आणू द्या, असे साकडे तेथील रहिवाशी महिलांनी महापालिका अधिकार्यांना घातले होते. महापालिकेने चांडक टावरच्या इमारतीला कुलुप लावले आणि इमारतीच्या बाहेर पन्नास फुटावर बॅरीकेटींग करून प्रवेश बंद केला आहे. आता तेथील रहिवाशांना अभियंतामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून, अहवाल सादर करण्याचे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे आता चांडक टावर खुले होण्यास सद्यास तरी ब्रेक लागला आहे. महापालिकेने रहिवाशांना खासगी अभियंतामार्फत स्ट्रक्चरल ऑडीट करण्यास सुचविले असून, यासंबंधाने शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील अभियंता, पुणे येथील अभीयंता व अन्य काही अभियंताची नावे सुध्दा सुचविली आहे.
महापालिकेचे उपअभीयंता प्रमोद इंगळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महापालिका प्रशासनाकडून खासगी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्या जात नाही. त्यामुळे चांडक टावर इमारतीतील रहिवाशांना अभीयंतामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. आता दुसरी नोटीस सुध्दा बजावण्यात आली असून, रहीवाशांनी अभीयंतामार्फत केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. इमारतीच्या सुरक्षेबाबत जबाबदारी रहिवाशींची असून, त्यांना सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच बॅरीकेटींग करण्यास सुचित करण्यात आले आहे.