- सात दिवस भजन किर्तनासह विविध कार्यक्रम
अंजनगाव सुर्जी :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान साखरी येथे २९ डिसेंबर पासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव व वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज यांचा ६७ वा पुण्यतिथी महोत्सव सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या उत्सवाचे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवामध्ये सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, ग्रामगीता प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सात दिवस ग्रामगीता प्रबोधन होणार असून ग्रामगीता प्रवचनकार ग्रामगीताचार्य ह.भ.प सुनील महाराज लांजुरकर यांच्या वाणीतून ऐकायला मिळणार आहे. सात दिवस कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला संमेलनसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे.
महिला संमेलनामध्ये अंजनगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका मालठाणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून समन्वयक उन्नत भारत अभियान भारत सरकारच्या अर्चना बाराते प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित राहणार आहेत. हभप भारुडसम्राट संतोष महाराज भालेराव, हभप लक्ष्मणदास काळे महाराज, हभप नारायणदास पडोळे महाराज, भजनसंध्या मध्ये गायक प्रभाकरराव पुरी, छत्रपती मलसने, तबलावादक रवी कुलकर्णी व संजय वांगे हे भजन संध्या सादर करणार आहेत. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी 'मी सावित्री बोलते' ही एकपात्री नाटिका वैशाली चराटे या सादर करणार आहे. समारोपीय कीर्तन सत्यपाल महाराजांचे शिष्य पवन पाल फुकट यांचा समारोपय सप्त खंजिरी वादनाचा किर्तन कार्यक्रम होणार आहे. ४ जानेवारीला ग्रंथ पूजनाचा कार्यक्रम व दु. २ ते ५ या वेळेत गावांमधून दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक निघणार आहे. ५ जानेवारीला स.१० वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. दु.१ वाजता पासून महाप्रसादाला सुरुवात होईल. महाप्रसादाचा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव मध्ये पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचा आवाहन श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान साखरी तर्फे करण्यात आले आहे.