- दोन मित्रही जखमी, नाईट पार्टीत झाला होता वाद
नागपूर : वादग्रस्त भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव व त्याच्या मित्रांवर काही लोकांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप उईके व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. जखमी मित्रांमध्ये आशिष हजारे आणि आनंद शाह याचा समावेश आहे. आनंदची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अर्जुन, आशिष आणि आनंद हे तिघेही व्हीआर मॉलमधील एजन्ट जॅक येथे पार्टीसाठी गेले होते. आरोपी प्रदीप उईके व त्याचा मित्रही आपल्या दोन महिला मित्रांसह तेथे पार्टीसाठी आले होते. रात्री 2.30 वाजताच्या सुमारास सर्व पार्टीकरून बाहेर आले. या दरम्यान प्रदीपच्या मित्राचा आशिषला पाय लागला. यावरून दोन्ही गटात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की सुरू झाली. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आणि दोन्ही गटांना मॉलमधून बाहेर काढले. अर्जुन, आशिष आणि आनंद तिघेही कारने घराकडे निघाले. प्रदीपने त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान त्याने आपल्या काही मित्रांनाही फोन करीत बोलावून घेतले. कांबळे चौकात अर्जुनचे वाहन अडविण्यात आले. त्यानंतर प्रदीप व त्याच्या मित्रांनी अर्जुन व त्याच्या मित्रांना वाहनातून खेचत बाहेर काढले. दगड व शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. अजनी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6-7 हल्लेखोर दिसत आहेत.
आरोपीवर खुनाचा गुन्हा आहे दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनचे वडील व भाजप नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांच्यावर दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमिनी बळकावणे, खंडणी, जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, ॲट्रॉसिटी असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांची संख्या दहाच्या आसपास असल्याचे शपथपत्र पोलिसांनीच न्यायालयात दाखल केले होते. मुन्ना यादवी यांची दोन्ही मुले करण आणि अर्जुन यांच्यावरही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी प्रदीप उईके याच्यावरही खुनाचा गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात येते. अर्जुनवरील या हल्ल्यामागे फक्त पार्टीतील वाद आहे की, अन्य कोणते कारण याचा शोध पोलिस घेत आहेत.