नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी अभियानांतर्गत, बहुतेक वस्तू, शस्त्रे, उपकरणे भारतात बनविण्यावर भर दिल्याने भारताची सीमा सुरक्षा वाढली आहे.
गत वर्ष 2022 च्या तुलनेत यावर्षी 3 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या शस्त्रास्त्र उपकरणांची निर्यात झाली आहे. यासोबतच देशात एक लाख कोटी रुपयांची सुरक्षा उपकरणे तयार करण्यात आली आहेत. एलसीए तेजस, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, विमानवाहू युद्धनौका आणि इतर शस्त्रास्त्रांना यावर्षी जगभरातून मागणी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये सुमारे 16 हजार कोटी रुपयांची निर्यात झाली. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 हजार कोटी रुपये आणि 2016-17 पेक्षा दहापट जास्त आहे.
भारत सध्या 85 हून अधिक देशांमध्ये संरक्षण उत्पादनांची निर्यात करतो. भारताची रचना आणि तंत्रज्ञान श्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या देशातील 100 हून अधिक कंपन्या इतर देशांना संरक्षण उत्पादने निर्यात करत आहेत. यामध्ये शस्त्रास्त्रांपासून ते विमान, क्षेपणास्त्रांपासून रॉकेट लाँचरपर्यंतचा समावेश आहे.