- अमरावती तालुक्यातील गावे;लोकप्रतिनिधी गप्प का?
चांदुर रेल्वे : गेल्या अनेक वर्षांपासून चांदुर रेल्वे शहराची वाढीव पाणी पुरवठा मागणी प्रलंबित असताना पहिले तालुक्यातीलच पाच आणि आता तालुक्याच्या बाहेरील इतर आठ गावांना मालखेड तलाववरील पाणी दैनंदिन वापरासाठी देणार असल्याचे माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता पहिलेच चार दिवसाआड पाणी मिळणाऱ्या चांदुर रेल्वे शहरवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
सर्वसामान्यांना ही बाब उशिरा समजत असली तरी सर्वच लोकप्रतिनिधी मात्र याबाबत गप्प का अस प्रश्न निर्माण होत आहे. काही वर्षाअगोदर पाण्याचा प्रचंड दुष्काळ सोसला असतांना अतिरिक्त पाणी पुरवठा योजनेतुन जलजीवन मिशन अंतर्गत मालखेड तालावावरून चिरोडी, सावगी मग्रापुर, कारला, थुगाव, पाथरगाव या ५ गावाकरीता प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता देवून जलदगतीने प्रशासकीय मान्यता देण्यांत आलेली आहे, त्यासाठी शहर काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले होते त्याची कुठलीही दखल प्रशासनाने घेतली नाही तर सोबतच अमरावती जिल्ह्यातील आणखी आठ गावांना दैनंदिन वापरासाठी 0.624 दलघन पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून समजते. यावरून चांदुर रेल्वे शहरावरील अन्यायाची परंपरा कायम ठेवत शहराचे हक्काचे पाणी पळविल्या जात असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केल्या जात आहे, चांदुर रेल्वे शहराला मालखेड तलावावरून गुरुत्वाकर्षनाणे पाणी पुरवठा होत आहे, शहराची क्षेत्रवाढ होऊन त्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी नगर परिषदेने केली होती. परंतु शहराची ही वाढीव पाणीपुरवठा मागणी शासनाने अमान्य केली आहे, तर दुसरीकडे त्याचवेळी या गावांसाठी अतिरिक्त पाण्याची मागणी पुर्ण करण्यांत येत असणे, ही चांदुर वासीयांवर अत्यंत क्रुर अन्याय करणारी बाब असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.
मतदार संघाच्या बाहेरील गावांना पाणी
शहराचे हक्काचे पाणी असलेले तसेच सिंचनासाठी मिळत असलेले पाणी आता तालुक्यातील पाच गावे त्यामध्ये चिरोडी,सावंगी मग्रपुर,थुगाव,कारला,पाथरगाव या गावांना 0.417 दलघम तर याशिवाय आता पुन्हा त्याच योजनेतून पुन्हा भानखेड बु, भानखेड खुर्द , मोगरा, कस्तूरा, अहमदपूर,पारडी, उदखेड, अऱ्हाड या अमरावती तालुक्यातील आठ गावांना 0.624 दलघम पाणी सोडण्यात येणार आहे.
रब्बी साठी करावे लागले आंदोलन
यावर्षी चांगला पाऊस झाला असतांना मालखेड तलाव 80 टक्केच भरला गेला त्यामुळे रब्बी साठी पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले होते आता याच तलाववरून तालुक्यातील आणि तालुक्या बाहेरील इतर गावांनाही पाणी देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे पुढील भविष्य संकटात येणार असल्याची ही चर्चा तालुक्यात होत आहे.