- आ.सुलभा खोडके यांची विधान भवनात लक्षवेधी
अमरावती : येथील मध्यवर्ती बस स्थानक व आगाराच्या जुन्या इमारतीची पुर्नबांधणी व विस्तारीकरणाबाबत आ. सुलभा खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान लक्षवेधी सूचना मांडली. या संदर्भात शासनाला दिलेला प्रस्ताव कधी व किती दिवसात मान्य करणार असा प्रश्न उपस्थित केला.
मागील ७० वर्षांपासून प्रवाश्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या अमरावती मध्यवर्ती बस स्थानक व एस.टी.आगाराला सद्या घर -घर लागली आहे. इमारत जुनी झाली असून क्षतीग्रस्त होण्याच्या मार्गांवर आहे. त्याठिकाणी स्वच्छता नसून प्रसाधन गृह व अन्य सुविधांची सुद्धा व्यवस्था ही जुनीच असून मोडकळीस आली आहे.
पावसाच्या दिवसात बसस्थानकाला गळती लागत असून विद्यार्थी, महिला व प्रवाश्यांना गैरसोय सहन करावी लागते आहे. त्याअनुषंगाने अमरावती मध्यवर्ती बसस्थानक व आगाराची पुर्नबांधणी तसेच तेथे सुरक्षित प्रवासीसेवा व चालक- वाहक व कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता आदी बाबींना घेऊन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी गेल्या २६ सप्टेंबर २०२३ रोजी पाहणी केली होती. सद्यस्थितीत अमरावती एस.टी. आगार व बसस्थानक हे जवळपास साडेतीन एकर जागेत आहे. त्यामुळे तेथील गॅरेज (वर्कशॉप ) व मध्यवर्ती बसस्थानक असे दोन भाग मिळून एक सुसज्य व प्रशस्त नवीन बसस्थानकाची पुर्नबांधणी व विस्तार करणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेला व सुविधेला घेऊन आवश्यक असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या बाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता . तसेच अमरावती मध्ये तपोवन- विद्यापीठ भागात एक गॅरेज (वर्कशॉप ) आहे. त्याठिकाणी एसटी बस चे गॅरेज कायम ठेवून तेथूनच दुरुस्तीचे कामे सुरळीत ठेवण्याबाबत सुद्धा प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे . या बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असतांना सुद्धा अद्यापही मान्य करण्यात न आल्याने आ. सुलभा खोडके सभागृहात चांगल्याच आक्रमक झाल्या. तसेच याबाबतचा दिलेला प्रस्ताव कधी मान्य करणार असा प्रश्न आमदार महोदयांनी उपस्थित करून परिवहन मंत्री दादाजी भुसे यांचे लक्ष वेधले . दरम्यान सन्मानित पीठासीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रवासी सेवेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असून यावर २० प्रश्न प्राप्त झाले आहेत . तसेच ४४ सदस्यांनी याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहे. आता अत्यंत महत्वाचा विषय असल्याने दुसऱ्या दिवशीच्या कामकाजा दरम्यान स्पेशल सीटिंग ला घेऊन यावर चर्चा करू अशी सूचना अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही
तसेच आ.सुलभाताई खोडके यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देतांना परिवहन मंत्री दादाजी भुसे म्हणाले की बस स्थानकांचा विकास व ते बीओटी तत्वावर देण्याला घेऊन सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्या नंतर एका महिन्यात यासंदर्भात पुढील कार्यवाही करणार असल्याचे मंत्री भुसेंनी स्पष्ट केले.