स्कायवॉकचे काम दोन वर्षापासून बंदच; तातडीने काम पूर्ण करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

    18-Dec-2023
Total Views |
 
chikhaldara-skywalk-project - Abhijeet Bharat
 
चुरणी : चिखलदरा येथील स्कायवॉकचे मागील दोन वर्षापासून विविध कारणाने काम बंद आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून निसर्गाने चिखलद:याला भरभरून दिले आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून याबरोबरच चिखलद:याला लागूनच व्याघ्र प्रकल्प व मोठ्या प्रमाणात जंगलाचे वनवैभव लाभल्याने महाराष्ट्रासह देशभरातील व जागतिक दर्जाचे पर्यटकसुद्धा चिखलद:यात येतात.
 
या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने व सिडको कंपनीने या ठिकाणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पर्यटकांसाठी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला व त्याचे ८० ते ९० टक्के काम पूर्णही झाले. या प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून स्थानिकांना सुद्धा या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. हा प्रकल्प झाल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावणार असून त्या माध्यमातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. या ठिकाणच्या आदिवासी बांधवांना सुद्धा या प्रकल्पापासून रोजगार मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प व्हावा, अशी जनसामान्यांची भावना आहे. या प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी छोट्या-मोठ्या उद्योगांची या ठिकाणी उभारणी केली आहे. परंतु मागील दोन वर्षापासून स्कॉयवॉकचे काम बंद असल्यामुळे व्यवसायिकांची निराशा होताना दिसत आहे.