नागपूर:
थोर चित्रकार सदानंद कृष्णाजी बाकरे यांच्या 16 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय स्तरावरील ‘ऑन द स्पॉट पेंटिंग स्पर्धा 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते 3.30 च्या दरम्यान नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, खंडेलवाल ज्वेलर्सच्या समोर, धरमपेठ, नागपूर येथे होणार आहे.
एस. के. बाकरे मेमोरीयल सोसायटी व धरमपेठ शिक्षण संस्थेच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेत स्थानिक फाईन आर्ट कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह नवरगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा अनेक ठिकाणाहून सुमारे शंभर विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर यावेळी पेंटींग करायचे आहे. विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार असून बक्षिस वितरण समारोह त्याचदिवशी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सोबतच, प्रसिद्ध चित्रकार स्व. अरुण मोरघडे यांच्या पेटींगचे प्रदर्शन दिनांक 18 ते 21 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून दररोज सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
भारतातील मॉडर्न आर्टचे पितामह मानले जाणारे सदानंद बाकरे यांनी चित्रकारी व मूर्तिकारी अशा दोन्ही कलाक्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले होते. बाकरे हे बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपचे संस्थापक होते. त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांचे मानसपुत्र मिलिंद लिंबेकर यांनी एस. के. बाकरे मेमोरियल सोसायटीची स्थापना करून त्यांच्या स्मृतिंना उजाळा मिळावा व नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
प्रवेश नि:शुल्क असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लिंबेकर व सचिव सदानंद चौधरी यांनी केले आहे.