- हजारो बांधवांची विधान भवनावर धडक, ‘जय लहुजी’च्या घोषनेने परिसर दणाणला
नागपूर : मातंग समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लहुजी शक्ती सेनेने विधीमंडळावर धडक दिली. अकराशे किमी पायी यात्रेचा समारोप बुधवारी नागपुरात झाला. राज्यभरातून आलेले हजारो समाज बांधव जय लहुजींच्या घोषणा देत होते. या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
Watch Video :
लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे आणि संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात पुणे येथून पदयात्रेला सुरुवात झाली. 27 दिवसात 1100 किमी अंतर चालत ही पदयात्रा नागपुरात पोहोचली. राज्यभरातील हजारो समाजबांधव पिवळा झेंडा घेवून मोर्चात सहभागी झाले. टेकडी मार्गावर मोर्चा थांबविल्यानंतर सर्वत्र पिवळे झेंडेच दिसत होते. आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा समाजबांधव देत होते. दरम्यान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक वर्षांपासून मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले जाते. मात्र, आश्वासनाच्या पलिकडे काहीच मिळत नाही. त्यामुळे समाजाचा विकास खुंटत चालला आहे. आता अनुसूचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड प्रमाणे वर्गीकरण करून मातंग समाजाला तत्काळ न्याय देण्यात यावा. साहित्यरत्न अण्णाभाउ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात यावी, लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या संपूर्ण शिफारसीची त्वरित अंमलबजावनी करण्यात यावी, मातंग समाजाच्या विकासाला गती देण्यात यावी, लहुजी साळवे यांचा पुतळा संसद भवन, विधानभवन परिसरात बसविण्यात यावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविण्यात यावे, पुणे येथील तालिमला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळाने संबधित मंत्र्याची भेट घेवून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विष्णू कसबे, कैलास खंदारे, डॉ. चंद्रकांत गादेकर, डॉ. मारोती लोंढे, देवीदास कसबे, रोहित खळसे, दत्ता जगताप आणि मैना लोंढे यांचा समावेश होता.