नागपूर : कलाल-कलार समाज हा ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागात वसला असून समाजाची लोकसंख्या 55 लाख आहे. तरीही आतापर्यंत एकही जनप्रतिनिधी नसल्यामुळे समाजाच्या समस्या शासनापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे समाजाला न्याय मिळावा, यासाठी भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र कलाल समाज संघटनेचा विराट मोर्चा विधानभवनावर धडकला. सागर समुद्रवार, सरचिटणीस संतोष खंबलवार आणि मार्गदर्शक चंद्रपाल चौकशी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
कलार-कलाल सर्वशाखीय समाज हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. समाजाची संख्या 55 लाखांवर असतानाही आतापर्यंत कलाल समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही. जनप्रतिनिधी नसल्यामुळे समाजावर वारंवार अन्याय होतो. समाजाची भूमिका मांडण्यासाठी कुणीही नसल्यामुळे शासनसुद्धा वारंवार दुर्लक्ष करते. कलाल-कलार समाज शक्य होईल तेवढे सामाजिक कार्य करीत असतो. समाजातील अनेक जण समाजकार्यात कार्यरत आहेत. कोवीड काळात समाजाने मोठे योगदान दिले आहे.
समाजातील बहुतेक वर्ग मजूर असून अनेकदा स्थानांतर होत असल्याने त्यांना योग्य तो सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिरता मिळाली नाही. त्यामुळे शासनाने कलाल समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर वसतीगृहासाठी नाममात्र किंमतीत जागा उपलब्ध करून द्यावी, समाजाचा पारंपारिक व्यवसाय मद्यविक्री असून परवाने वितरण करताना प्राथमिकता द्यावी. कलाल-कलार समाजाचा समावेश विश्वकर्मा योजने अंतर्गत करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शिष्टमंडळाने संबंधित मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले.