- कृषी विभागाकडून सर्वेक्षण नाही
- शेतकऱ्यांमध्ये चिंता
चांदूर रेल्वे : तालुक्यात नोव्हेंबरच्या शेवटी लागोपाठ सहा दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोराचा झटका दिल्याने राहिलेले तुरीचे पीक, फळभाज्या व हरभरा करपण्याच्या बेतात आहे. तुरीला आलेला फुलोरा हा नष्ट झाला आहे. ६५१६ हेक्टरवरील तूर नष्ट होण्याच्या मार्गावर असली तरी कृषी विभागाकडून अद्याप सर्वेक्षण झालेले नाही.
पावसासोबत सुटलेल्या हवेमुळे तुरीची झाडे वाकून फुलोरा जमिनीला टेकला आहे. खरीप पिकात सोयाबीन, तूर अशी पेरणी झाली होती. सोयाबीन पिकावर येलो मोझॅक ही कीड आढळून आल्याने ७५ टक्के सोयाबीन उत्पादन कमी झाले आहे. याबाबत सोयाबीनचे कृषी विभागाकडून सर्वेक्षण झाले तरी त्याची भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता शेतात राहिलेले तुरीचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून याबाबत कोणताही संबंधित अधिकारी बोलायला तयार नाही. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत या पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण केले जाणार नसल्याची माहिती कृषी विभागातून दिली जात आहे.
सोयाबीनचे पीक हातून गेल्याने आता शेतकऱ्यांची भिस्त तुरीच्या पिकावर होती. परंतु, तुरीचे पीक हातचे निघून गेले. याबाबत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या तूरीच्या पिकाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना देऊन तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी चांदूर रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
हरभऱ्यावर मर रोग
नोव्हेंबर महिन्यात शेवटी पावसाळ्यासोबतच चार दिवस धुके पडल्याने तुरीचा फुलोरा गळून पडलेला आहे. त्याचबरोबर रब्बीतील हरभऱ्यावर मर रोग येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.