‘प्राईम व्हिडिओ’वर २४ नोव्हेंबरला ‘दि व्हिलेज’ या हॉरर सीरीजचा जागतिक प्रीमियर!

    09-Nov-2023
Total Views |
 
prime-video-the-village-series-horror-show - Abhijeet Bharat
 
मुंबई : भारतातील सर्वात पसंतीचे मनोरंजन स्थळ असलेल्या ‘ प्राईम व्हिडिओ’ने मूळ तमिळ भाषेत असलेली त्यांची आगामी मालिका- ‘दि व्हिलेज’ प्रदर्शित करण्याची तारीख आज जाहीर केली आहे. प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत मोठे कुतुहल आहे, त्यामुळेच ही मालिका प्रसारित होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. मिलिंद राऊ दिग्दर्शित ‘दि व्हिलेज’ ही हॉरर सीरिज आहे. ही अश्विन श्रीवतसंगम, विवेक रंगाचारी आणि शमिक दासगुप्ता यांच्या याच नावाच्या ग्राफिक हॉरर कादंबरीवर आधारित आहे, जी प्रारंभी ‘याली ड्रीम वर्क्स’ने प्रकाशित केली होती. या मालिकेची कथा अशा एका व्यक्तीभोवती फिरते, जी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कठीण मोहिमेवर निघते.
 
 
 
स्टुडिओ शक्ती प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली बी. एस. राधाकृष्णन यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचे लेखन मिलिंद राऊ, धीरज वैद्य आणि दीप्ती गोविंदराजन यांनी केले आहे. या मालिकेत लोकप्रिय तमिळ अभिनेता आर्य प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत दिव्या पिल्लई, अझिया, आडुकलम नरेन, जॉर्ज मायन, पी. एन. सनी, मुथुकुमार के., कलैरानी एस.एस., जॉन कोक्कन, पूजा, व्ही. जयप्रकाश, अर्जुन चिदंबरम आणि थलाइवासल विजय या प्रतिभावान कलावंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘दि व्हिलेज’ ही मूळ तमिळ मालिका ‘प्राईम व्हिडियो’वर २४ नोव्हेंबर रोजी भारतात तसेच जगभरातील २४० देशांत आणि प्रांतांत प्रदर्शित केली जाणार आहे. मूळ तमिळ असलेली ही हॉरर सीरिज इंग्रजी सबटायटल्ससह तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये डब करण्यात आली आहे. ‘दि व्हिलेज’ ही ‘प्राईम’ सदस्यत्वात नव्याने दाखल झालेली सर्वात अलीकडची मालिका आहे. भारतातील प्राईम सदस्य वर्षाचे केवळ १४९९ रु. सदस्यत्व शुल्क भरून मनोरंजनाचा आनंद तर लुटतातच, त्यासोबत विविध सुविधा तसेच खरेदीवर बचतही प्राप्त करतात.
 
 
या प्रसंगी बोलताना ‘प्राईम व्हिडिओ’च्या भारत आणि आग्नेय आशिया क्षेत्राच्या ‘ओरिजिनल्स’ विभागाच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्हणाल्या, प्राईम व्हिडिओमध्ये आमच्या दर्शकांची वैविध्यपूर्ण अभिरूची आणि प्राधान्यक्रमांची पूर्तता करणे हे आमचे ध्येय आहे. गेल्या काही वर्षांत भारतात तसेच परदेशात भयपट आणि रहस्यपट शैलींबाबत प्रेक्षकांचे स्वारस्य सातत्याने वाढत असल्याचे आम्हांला दिसून येत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, ‘दि व्हिलेज’ या मालिकेला आमच्या मालिकांच्या यादीत विशेष स्थान प्राप्त आहे. एका ग्राफिक कादंबरीपासून प्रेरित असलेल्या या मालिकेची कथा अत्यंत अनोखी आहे आणि कदाचित देशातील भयपट व साहस्यपटासंदर्भातील मनोरंजनाच्या क्षेत्रात आजमितीस अशी कथा पाहायला मिळालेली नाही. दिग्दर्शक मिलिंद राऊ यांनी आपली कलादृष्टी प्रेक्षकांपर्यंत कमालीच्या जिवंतपणाने पोहोचवली आहे, कलाकारांच्या सहज अभिनयातून हे अधिक सुस्पष्ट होत जाते. ‘दि व्हिलेज’ ही मालिका म्हणजे रहस्य आणि आश्चर्यकारक थरार असलेले एक उत्तम कौटुंबिक नाट्य आहे. मोहक दृश्ये आणि वातावरण असलेली ‘दि व्हिलेज’ ही मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी खरोखरीच एक रम्य अनुभव ठरेल.
 
सर्जनशील निर्माता आणि दिग्दर्शक मिलिंद राऊ म्हणाले, “प्राइम व्हिडिओसोबत एकत्र काम करत, सर्वांनी मन लावून मेहनतीने साकार केलेली ‘दि व्हिलेज’ ही मालिका जगभरातील प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हांला खूप आनंद होत आहे. माझा विश्वास आहे की, एक चांगली हॉरर सीरीज किंवा चित्रपट असा असतो, जो पाहिल्यानंतर तुम्हांला रात्री एकट्याने बाहेर जायला भीती वाटते. एखादी फांदी तुटल्याच्या आवाजानेही तुमच्या हृदयाचा ठोका चुकतो आणि तुमच्या सभोवतालच्या सावल्यादेखील जितीजागती माणसं आहेत, असे तुम्हांला वाटत राहते. अशा प्रकारचा अत्यंत घाबरवणारा भयकारी आशय मला भयपट आणि रहस्यमय शैली आवडणाऱ्या सर्व प्रेक्षकांसमोर सादर करायचा होता. मला विश्वास आहे की, ‘दि व्हिलेज’चे सर्व कलाकार आणि टीमने एकत्रित येऊन अशी मालिका बनविण्यात यश संपादन केले आहे, जी भयपटाची शैली आवडणाऱ्या प्रेक्षकांसोबतच आगळीवेगळी कहाणी आणि अव्वल दर्जाच्या सिनेमाचा अनुभव हवा असलेल्या सर्वांनाच नक्की पसंत पडेल.