- पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे केले आवाहन
नागपूर : पर्यावरणासाठी सिंगल युज्ड प्लास्टिक हे घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी मोहिम अंतर्गत मनपाच्या दहाही झोन निहाय एकल वापर प्लास्टिक बाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारताकडे देशाचा प्रवास आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची तत्त्वे (मिशन LiFE) यांच्यासोबत दिवाळीच्या सांस्कृतिक महत्त्वाची सांगड घालणे हा या मोहिमेचा उद्देश असून, प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा, तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी या संदेश देण्याकरिता मनपाच्या दहाही झोन निहाय एकल वापर प्लास्टिक बाबत हातात जनजागृती फलक घेऊन रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
दहाही झोनचे सहायक आयुक्त, मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना एकल वापर प्लास्टिक पर्यावरणासाठी कसे घातक आहे याबाबत जनजागृती केली. धरमपेठ झोनमध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी जनजागृती करण्यास मनपाचे सहकार्य केले. यावेळी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक व स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह संस्थेचे स्वयंसेवक, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.