Nagpur : बिमला देऊस्‍कर यांनी केली 16500 फूट चढाई

09 Nov 2023 15:52:05
 
bimla-deoskar-arunachal-himalayan-expedition-2023 - Abhijeet Bharat
 
नागपूर : माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला पद्मभूषण बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात 13 भारतीय साहसी महिलांच्‍या पथकाने अरुणाचल प्रदेशातील गोरिचेन ग्लेशियरवर 16,500 फूट चढाई केली. या पथकात नागपूरच्‍या गिर्यारोहक बिमला देऊस्‍कर यांचा देखील समावेश होता.
 
टाटा स्टील ॲडव्हेंचर फाऊंडेशनने आर्मी ॲडव्हेंचर आणि इन्क्रेडिबल इंडिया डेस्टिनेशन अरुणाचल प्रदेश यांच्या सहकार्याने 'समिट्स ॲण्ड स्टीअरिंग व्हील' या नावाने ही मोहिम आखली गेली होती. यात 52 ते 82 वयोगटातील गिर्यारोहक महिला सहभागी झाल्‍या होत्‍या. पद्मभूषण बचेंद्री पाल यांच्यासह पद्मश्री चंद्रप्रभा ऐतवाल (82), वसुमती श्रीनिवासन (70), बिमला देऊस्‍कर (56), मेजर कृष्णा दुबे (57), गंगोत्री इंदुमती (64), पायो मुर्मू (55), कमांडंट सीमा टोलिया (52), एल. अन्नपूर्णा (53), सुषमा बिसा (57), आशा तोमर (67), मीनाक्षी पोपाली (67) आणि शिल्पा (61) यांचा समावेश होता.
 
प्रसिद्ध गिर्यारोहक आणि 14 एव्हरेस्ट गिर्यारोहकांना प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय साहसी पुरस्कार प्राप्त बिमला देऊस्‍कर यांनी मागील वर्षी ट्रान्स हिमालयन ट्रेकमध्‍ये सहभाग घेतला होता. त्‍यात बिमला यांना अपघात झाला व हिप बोन फ्रॅक्चर झाले होते. त्‍यांच्‍यावर डॉ. निर्भय करंदीकर यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. त्‍यातून बऱ्या होत बिमला यांनी या मोहिमेत अतिशय हिंमतीने व आत्‍मविश्‍वासाने सहभागी होत, ही मोहिमदेखील फत्ते केली.
 
बिमला म्‍हणाल्‍या, ‘11 ऑक्टोबर 2023 रोजी निमस, दिरंग येथून आर्मी ॲडव्हेंचर सेलचे संचालक कर्नल चौहान यांनी हिरवा झेंडा दाखवून मोह‍िमेला प्रारंभ केला होता. आमच्‍या महिला पथकाने काही अतिदुर्गम आणि खडतर मार्गावरून मार्गक्रमण करीत बोमडी ला, सेला पास आणि बुम ला मार्गे प्रवास करत आणि जिमिथांग गोरसम चोरटेन मठ आणि तवांग मठ यासारख्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट ही कामगिरी केली. आम्‍ही सर्व महिला 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होतो. सर्वांनी अतिशय धेर्याने आणि चिकाटीने ही मोह‍िम पूर्ण केली.
 
शारीरिक आणि मानसिक धैर्याची परीक्षा घेणाऱ्या या मोहिमेत बिमला देऊस्‍कर यांच्‍यासह इतर सर्व महिलांनी सामाजिक रूढीपरंपराही मोडीत काढत जागतिक स्तरावर महिलांना स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित केले आहे. दुखापतीतून सावरून 16,500 फूट चढाई करणाऱ्या बिमला सर्व महिलांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरल्‍या आहेत.
Powered By Sangraha 9.0