विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार गुणवत्तेत वाढ; आठवड्यातून एकदा अंडी, केळी देणार

08 Nov 2023 13:11:43
 
maharashtra-school-student-nutrition-program - Abhijeet Bharat
(Image Source : Internet/ Representative) 
 
मुंबई : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहे.
 
या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येईल.
 
हा उपक्रम 23 आठवड्यांकरीता सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरवणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
 
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0