भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल - भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक

08 Nov 2023 13:18:58
  • राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून वांगचूक यांचे राजभवनात स्वागत
india-bhutan-economic-power-shift - Abhijeet Bharat
 
मुंबई : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये ‘आपण साध्य करु शकतो’ हा विश्वास जागृत झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता असलेला भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती होईल, असा विश्वास भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी व्यक्त केला. राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी ७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
मित्सुबिशी कंपनीच्या अध्यक्षांशी आपली भेट झाली असताना त्यांनी तीन गोष्टींना आपण प्राधान्य देत असल्याचे आपणांस सांगितले. कृत्रिम प्रज्ञा, पर्यावरण समाज सुशासन व भारत हा आपला प्राधान्यक्रम असल्याची आठवण राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी राज्यपालांना सांगितली. भारत हा आपला सख्खा शेजारी व घनिष्ठ मित्र आहे असे सांगताना अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.
 
‘थ्री इडियट’ चित्रपटात लडाखचे चित्रण दाखवल्यानंतर तेथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अनेक पटीने वाढल्याचे नमूद करून भूतानमध्ये चांगल्या चित्रपटांचे चित्रीकरण झाल्यास आपणास आनंदच होईल, कारण त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असे त्यांनी सांगितले.
 
भूतानमध्ये मुलीच्या जन्माला फार महत्त्व दिले जाते. आपणांस दोन मुलांनंतर कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे आपण लवकरच आपल्या तिन्ही मुलांना कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भूतान नरेशांनी आपल्यासोबत आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांना ओळख करून दिली.
 
भूतान नरेशांचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल बैस म्हणाले की, महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील व्यापार सहकार्य अधिक वृद्धिंगत व्हावे. भूतानमधून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे येथे येतात. भूतान आणि महाराष्ट्र यांच्यातील शैक्षणिक देवाणघेवाण अधिक वाढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 
महाराष्ट्र आणि भूतान यांच्यातील संबंधांचे मूळ इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक जनसंपर्क यामध्ये आहे. कान्हेरी, अजिंठा आणि एलोरा लेणी ही भूतानच्या पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ठिकाणे असल्याचे राज्यपालांनी स्वागत भाषणात सांगितले. भूतानचा सांस्कृतिक महोत्सव मुंबईत आयोजित केला जावा व तसेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक महोत्सव देखील भूतानमध्ये आयोजित केला जावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
 
औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, नेमबाज अंजली भागवत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेते प्रशांत दामले, उद्योगपती प्रकाश हिंदुजा, उद्योजक अजय पिरामल तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0