नागपूर : आधार सोशल फाऊंडेशन महाराष्ट्राच्या वतीने श्याम ठाणेदार यांचा आदर्श स्तंभलेखक पुरस्कराने गौरव करण्यात आला. पुण्यातील सायन्स पार्कच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पदक असे पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कार सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रवींद्र कुलकर्णी, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानस कन्या सूनिताताई मोडक, आधार सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विक्रम शिंगाडे, प्रसिद्ध लेखक, वक्ते प्रकाश कदम, संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ शहाबुद्दीन पठाण आदी मान्यवर उस्थितीत होते. श्याम ठाणेदार यांचे वृत्तपत्र लेखनातील कार्य उल्लेखनीय आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर गोवा आणि कर्नाटक राज्यातील वर्तमानपत्रात देखील ते स्तंभलेखन करतात. त्यांचे वृत्तपत्र लेखनातील योगदान विचारात घेऊनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. वृत्तपत्रातील त्यांच्या वैचारिक लेखनाबद्दल त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.