इन्फ्लुएंझा मृत्यू विश्लेषण समितीने घेतला परिस्थितीचा आढावा

07 Nov 2023 18:51:45
 
influenza-mortality-analysis-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : इन्फ्लुएंझा मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) मंगळवारी नागपूर शहरात इन्फ्लुएंझा मुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, मेयो रुग्णालयाचे सुक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रविंद्र खडसे, वैद्यकिय अधिकारी उपसंचालक कार्यालय डॉ. प्रांजला पेटकर, मेयो रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. गुंजन दलाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र भगत व खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
बैठकीमध्ये समितीपुढे इन्फ्लुएंझा ए मुळे मृत पावलेल्या तीन रुग्णांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता दोन रुग्ण नागपूर शहरातील व एक रुग्ण मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागातील होते. यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू इन्फ्लुएंझा ए एच 1एन1 मुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. 1 जानेवारी 2023 पासून स्वाईन फ्ल्यू मृत्यू विशलेषण समितीच्या एकूण 11 बैठक घेण्यात आल्या. यात 15 मृत्यू इन्फ्लुएंझा ए एच1एन1 मुळे झाल्याचे जाहिर करण्यात आले आहेत. यामध्ये मनपा नागपूर हद्दीतील निवासी रुग्णाची संख्या 10 इतकी आहे. यासोबत आज शुक्रवारी नागपूर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू इन्फ्लुएंझा ए एच3एन2 च्या संक्रमणामुळे झाल्याचे मान्य करण्यात आले.
 
सद्यस्थितीत 1 जानेवारी 2023 पासून नागपूर शहरातील इन्फ्लुएंझा ए एच1एन1 या आजाराच्या 61 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या 8 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 45 रुग्ण आजारातून मुक्त झाले असून 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. एकूण 8 मृत्यूमध्ये 4 महिला व 4 पुरुषांचा समावेश आहे. एकूण 8 इन्फ्लुएंझा ए एच1एन1 मृतांमध्ये सहव्याधी असणाऱ्या व जेष्ठ नागरिक रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी इन्फ्लुएंझा सदृष्य लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये व त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
 
मनपा क्षेत्रातील इन्फ्लुएंझा बाधित मृतांची माहिती
 
  • इन्फ्लुएंझा ए एच1एन1 मृत्यू - 10
  • इन्फ्लुएंझा ए एच3एन 2 मृत्यू - 1
  • मनपा क्षेत्राबाहेरील इन्फ्लुएंझा बाधित मृतांची माहिती
  • इन्फ्लुएंझा ए एच1एन1 मृत्यू - 5
  • इन्फ्लुएंझा ए मृत्यू - 1
 
मृत्यू विश्लेषण समितीद्वारे इन्फ्लुएंझामुळे मृत रुग्णांच्या विश्लेषणावरुन काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत :
 
  1. सर्व आरोग्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहव्याधी असणारे व्यक्ती व जेष्ठ नागरिक यांनी फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळताच योग्य ते उपचार सुरु करावे व आरोग्य स्थितीवर लक्ष देऊन आवश्यकतेनुसार रुग्णालयात संदर्भीत करावे.
  2. ILR व सारी रुग्णांबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण सक्षम करावे.
  3. जेष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या रुग्णांनी इन्फ्लुएंझा ए लसीकरणाचा डोस घ्यावा.
  4. वैयक्तीक स्वच्छता जसे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरने हात निर्जंतूक करणे, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा, वारंवार स्पर्श होणा-या वस्तू, जागा निर्जंतूक करावे.
  5. फ्ल्यू सदृष्य लक्षणे असल्यास घरीच थांबावे गर्दीत जाऊ नये, भरपुर विश्रांती घ्यावी व पाणी प्यावे.
  6. जेष्ठ नागरिक व सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
  7. सर्व खासगी रुग्णालयांनी त्यांच्या आरोग्य संस्थेत उपचाराखाली असलेल्या ए एच1एन1 रुग्णांची माहिती मनपा साथरोग विभागास द्यावी.
 
मनपा आरोग्य विभागाद्वारे विभागाद्वारे रुग्णांच्या निवासी क्षेत्रात सर्वेक्षण करुन फ्ल्यू सदृष्य रुग्णांचा शोध व उपचार करण्यात येईल त्यामुळे रुग्णाचा प्रसार होणार नाही.
 
काय करावे ?
  • • वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
  • • पौष्टिक आहार घ्या.
  • • लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारखा आरोग्यदायी आहार घ्या.
  • • धुम्रपान टाळा.
  • • पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या.
  • • भरपूर पाणी प्या.
काय करू नये ?
  • • हस्तांदोलन
  • • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
  • • डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका.
  • • आपल्याला फ्ल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
Powered By Sangraha 9.0