नागपूर : दत्त संप्रदायात औदुंबर प्रदक्षिणेला विशेष महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमन दिनाच्या पुण्यपर्वावर जयप्रकाशनगर येथील गुरुमंदिरात शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी अखंड औदुंबर प्रदक्षिणेचा कार्यक्रम आयोजिला आहे.
श्री गुरुद्वादशीच्या पुण्यपर्वावर आयोजित या कार्यक्रमाची सकाळी 6.20 वाजता सामूहिक संकल्पोच्चाराने सुरुवात होणार आहे. सकाळी 6.23 पासून सायंकाळी 5.23 पर्यंत औदुंबराला अखंड प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5.45 ते 7.30 पर्यंत श्रींची पालखी प्रदक्षिणा होईल. आरतीनंतर महाप्रसादाने प्रदक्षिणा सोहळ्याची सांगता होईल. तेव्हा भाविकांनी या संधीचा लाभ घेऊन अखंड प्रदक्षिणा सोहळ्यात दिवसभरात जमेल त्यावेळी सहभागी व्हावे व संध्याकाळी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. विष्णुदास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्राचे केंद्रप्रमुख कल्याण पुराणिक यांनी केले आहे.