यवतमाळ : आजच्या युगात विकासाची व्याख्या काहीही असली तरी स्वत:चे मन ताब्यात आणणे, हाच खरा विकास होय. मन हे करत असते. मनाची निश्चितता म्हणजे बुद्धी आणि बुद्धीची निश्चितता म्हणजे विवेक होय, असे मत धर्मभास्कर पू. पू. सदगुरूदास महाराज यांनी मांडले.
यवतमाळ येथील शिरे लेआउटमधील प्रा. दत्ता जोशी यांच्याकडील बालगणेश व दत्तमुर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात ते बोलत होते. श्री बालगणेश दत्त मंदिरात रविवारी हा कार्यक्रम झाला. या तीन दिवसीय उत्सवात विविध धार्मिक अनुष्ठान करण्यात आले. सद्गुरुदास महाराजांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशपूजन, जलाधिवास कीर्तन, उत्सवमूर्तीची मिरवणूक आदी कार्यक्रमांमध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मन, बुद्धी एकत्र आली की सर्व साध्य होते पण त्यासाठी मनोभावे सद्गुरूला शरण जावे लागते. ते सांगतील त्या मार्गाचा अवलंब करावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होतो, असे सदगुरूदास महाराज यांनी सांगितले. यावेळी महंत रामबन महाराज पुसद, प्रा. अनंत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.