नागपूर : उपराजधानी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी ३५७ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका आणि ५ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका झाल्या. एकूण १२२४ मतदान केंद्रांवर रविवारी मतदान झाले असून गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी चांगले मतदान झाले आहे. जवळपास ८० टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सध्या मतमोजणी सुरु असून लवकरच निकाल जाहीर होणार आहे.
सद्यस्थितीत ३५७ पैकी १०० ठिकाणी भाजपाचे सरपंच विजयी झाले आहेत. सर्व ६ विधानसभा क्षेत्रात बहुसंख्य ठिकाणी भाजपा समर्थित सरपंच पदाचे उमेदवार विजयी ठरले असून कामठी विधानसभा क्षेत्रात ४२ पैकी पहिल्या फेरीत १६ ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थित सरपंच निवडून आला आहे. सर्वांत पहिला निकाल कंठी तालुक्यातील बाबूळखेडा येथून आला आहे. येथे भाजपा समर्थित सरपंचासह सर्व सदस्य विजयी झाले आहेत.
तसेच कोराडी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. एकमेकांवर गुलाल उधळून मिठाई भरविली जात आहे. निवडणुकाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील सुमारे ३५७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंचपदासाठी रविवारी मतदान झाले. यामध्ये ११८६ सदस्य आणि ६८८२ उमेदवार रिंगणात होते. त्याचे निकाल आज समोर येत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने तहसील स्तरावर मतमोजणीची व्यवस्था केली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत सर्व ग्रामपंचायतींची स्थिती स्पष्ट होईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीही बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्याची अधिकृत घोषणा आज होणार आहे.