कांचनताई गडकरींनी केले मेहंदी कलाकारांचे कौतुक

06 Nov 2023 18:51:11
 
kanchantai-gadkari-honors-mehandi-artists-nagpur - Abhijeet Bharat
 
नागपूर : खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने शारदीय नवरात्रोत्‍सवाच्‍या निमित्ताने शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांमधील विविध शारदोत्‍सव मंडळांमध्‍ये दर्शनासाठी येणाऱ्या महिलांच्‍या हातावर मेहंदी रेखाटण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्ताने संस्‍कार भारतीच्‍या अध्‍यक्ष कांचनताई गडकरी यांनी तीन शारदोत्‍सव मंडळांना भेट देत तेथील मेहंदी कलाकार व हौशी महिलांचे कौतुक केले.
 
कला, साहित्‍य, संस्‍कृती, परंपरांचा प्रचार व प्रसार व्‍हावा, या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सण, उत्‍सवांना ‘सांस्कृतिक’ रूप देण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्‍याअनुषंगाने खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍यावतीने ‘जागर शारदेचा, रंग मेहंदीचा’ हा उपक्रम राबवला जात आहे. शहराच्‍या विविध भागातील 230 हून अधिक शारदोत्सव मंडळांमध्‍ये मेहंदी कलाकारांनी सुरेख मेहंदी रेखाटली आहे. गिरीज बुक रेकॉर्ड करणाऱ्या मेहंदी आर्टिस्‍ट सुनिता धोटे यांच्‍या नेतृत्‍वात कलाकार शारदोत्‍सवात मेहंदीचे रंग भरत आहेत.
 
कांचनताई गडकरी यांनी रविवारी स्‍नेहनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, राजीव नगर येथील राममंदिर व कन्‍नमवार नगर येथील मंदिरांमध्‍ये जाऊन शारदेचे पूजन केले व उपस्थित कलाकार व भाविक महिलांशी संवाद साधला, अशी माहिती या उपक्रमाच्‍या संयोजिका मनिषा काशीकर यांनी दिली. यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समिती, नागपूरचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कादिर, संजय गुळकरी, रेणुका देशकर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, नितीन तेलगोटे यांचे सहकार्य लाभत आहे.
Powered By Sangraha 9.0