नागपूर : आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील नागपूरच्या प्रगतीने आणखी एक टप्पा गाठला आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी गेम चेंजर ठरणारी अत्याधुनिक मोबाईल कृत्रिम अवयव म्हणजेच आर्टिफिशियल लिंब व्हॅन नागपूरातील नागरिकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ६ नोव्हेंबर २०२३ रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्लूच्या बाजूला एनरिको हाइट्स येथे आयोजित कार्यक्रमात या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.
कृत्रिम अवयव मोबाईल व्हॅन ही आंध्रप्रदेश मेड टेक झोन (एएमटीझेड), विशाखापट्टणम या संस्थेतर्फे स्नेहभेट स्वरुपात देण्यात आली आहे. या व्हॅनमुळे दिव्यांग नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडून येणार आहे. या व्हॅनची रचना दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या कृत्रिम सहायक उपकरणाच्या गरजा भागवण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. थेट गरजूंच्या दारापर्यंत कृत्रिम अवयव सेवा पोहोचवण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. नागपुरातील किंवा ग्रामीण भागातील दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना कृत्रिम अवयव जसे ॲकल फुट आर्थोसिस, शु/ फुट वेअर मॉडीफिकेशन / स्पायनल ऑर्थोसिस हे सर्व २०० रुपये अशा अल्प दरात मिळणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यानेही व्हॅन कृत्रिम अवयव कमीत कमी वेळेत तयार होऊ शकतात. ज्यांच्या हातात किंवा पायात कुठल्याही प्रकारची विकृती-व्यंग असेल तर त्या व्यक्तिंना कृत्रिम अवयव देऊन हात आणि पायांच्या व्यवस्थित वापराची सुनिश्चितता केली जाते. त्यामुळे अशा व्यक्तिच्या जीवनात स्थैर्य आणि गतिशीलता येते आणि ते सक्षम जीवन जगू शकतात.
ही व्हॅन प्रत्येक गरजू व्यक्तीला तज्ज्ञांचा सल्ला, मूल्यांकन आणि गरजेनुसार सुविधा पुरवण्यासाठी उपयुक्त असेल. नागपूरसोबतच चंद्रपूर, गडचिरोली अशा अगदी दुर्गम भागातही आणि ज्यांना आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचण्यात अडचणी असतील अशाही लोकांची सेवा करेल, असा या व्हॅनचा मानस आहे. हा उल्लेखनीय उपक्रम दिव्यांग व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी एएमटीझेडची बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. ही व्हॅन उपलब्ध करून दिल्याबद्दल गडकरी यांनी एएमटीझेडचे आभार मानले आहेत. एएमटीझेड हे वैद्यकीय यंत्रे आणि उपकरणांचे अत्याधुनिक उत्पादन केंद्र आहे. एएमटीझेडने नागपूरकरांसाठी दिलेली ही व्हॅन दररोज १५ रुग्णांची तपासणी करु शकणार आहे.
ज्या सेवाभावी संस्थांकडे १५ रुग्ण असतील त्यांच्या चिकित्सेसाठी सदर ॲम्बुलन्स उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याकरीता संपर्क ०७१२-२२३९९१८ या क्रमांकावर साधावा. प्रोस्थेसिस आणि ऑर्थोसिस या दोन्ही गरजा पूर्ण करण्याची क्षमता या व्हॅनमध्ये आहे. भारतात इतरत्र अशी सोय नाही. दिव्यांगाचे मूल्यांकन, मोजमाप, फॅब्रिकेशन आणि डिव्हाइसेसचे वितरण वेगवान पद्धतीने करण्यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे.
व्हॅनमध्ये ओव्हन व आवश्यक उपकरणांची उपलब्धता आहे. त्यामुळे ती व्हॅन असेल तेथे अवयव तयार केले जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे या व्हॅनमध्ये तयार केलेल्या कृत्रिम सहाय्यक अवयवांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तराची आहे. प्रत्येक कृत्रिम अवयव रुग्णांच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निर्माण केला जाऊ शकतो.