ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले - सुनिल तटकरे

06 Nov 2023 16:04:58
  • पूर्व विदर्भातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस
ajit-pawars-decision-in-gram-panchayat-elections - Abhijeet Bharat
 
गोंदिया : आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. गोंदिया येथे आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे आहे हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो त्यांच्याशी संवाद साधला त्यावरून दिसून येतो. माझ्या नेत्याचा अभिमान आम्हाला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो असा आरोप करण्यात येतो मात्र ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी साहेबांची भेट घेतली होती मग ते काय होते? असा सवालही सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला.
 
विदर्भातील विकासाला चालना दिली ते आमचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या होमग्राऊंडवर हा मेळावा होत आहे. त्यांनी देशात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठी ताकद उभी करा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.
 
आपल्या पक्षाचा विकासाचा मुद्दा असून विकासाच्या वाटेवर आपल्याला चालायचे आहे. 'घड्याळ तेच आहे वेळ नवी' आहे. या नव्या वेळेनुसार विकास करणार आहोत, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी केले. या जिल्हयात युवकांसाठी नोकरी महोत्सवाचे लवकरच आयोजन करणार असल्याची घोषणा युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावेळी केली.
 
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याबद्दल गोंदियाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात राष्ट्रीय सचिव व नागपूर निरीक्षक राजेंद्र जैन, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर यांनी आपले विचार मांडले.
 
निर्धार नवपर्वाचा ही भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला असून आज गोंदिया येथे कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, निरीक्षक राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, युवक अध्यक्ष केतन तुरकर, बुथ कमिटी अध्यक्ष नरेश माहीश्र्वरी, महिला समाजकल्याण सभापती पूजा शेठ आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0