विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांचा नितीन गडकरी, फडणवीसांपासून आढावा

04 Nov 2023 12:17:36
 
Meeting on Dairy Development Projects
 
 
मुंबई :
विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास (Dairy Development Projects) या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.
 
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, राष्ट्रीय गोकुळ मिशनचे सहआयुक्त डॉ. भूषण त्यागी, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन दुग्धविकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेण्यात येईल. तसेच यातून 3,30,000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राज्य सरकार यासाठी निधी देणार आहे.
 
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री विखे पाटील म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतील. तसेच यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0