(Image Source : Internet)
भारतात सुरू असलेली एकदवसीय विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावर आला आली आहे. प्रत्येक संघाचे साधारणपणे सहा ते सात सामने संपले असून दोन किंवा तीन सामने उरले आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या या पहिल्या टप्प्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहे. अनेक दिग्गज संघांना पराभवाचे झटके मिळाले असून अफगाणिस्तान, नेदरलँड यासारख्या नवख्या संघाने अनपेक्षितपणे उसळी मारून क्रिकेट विश्वाला चकित केले आहे. सर्वात मोठा धक्का बसला तो गतविजेता इंग्लंड संघाला. इंग्लंड संघ हा गतविजेता असून यावेळीही तो विजेतेपदासाठी सर्वांचा फेवरेट संघ होता.
अनेक दिग्गज माजी खेळाडूंचा हा पहिल्या पसंतीचा संघ होता. स्पर्धेतील सर्वात बळकट संघ असूनही या संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. सहा सामन्यात केवळ एक विजय या संघाला मिळवता आला. अफगाणिस्तान, नेदरलँड यासारख्या नवख्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने हा संघ तळाशी गेला आहे. तीच अवस्था बांगलादेश आणि श्रीलंका या देशांची झाली आहे. या संघानेही लौकिकास साजेशी कामगिरी केली नाही. पाकिस्तान हा या स्पर्धतील सर्वात धोकादायक संघ समजला जात होता. या संघाचाही अनेकांनी संभाव्य विजेत्यांच्या यादीत समावेश केला होता मात्र त्यांनाही विशेष कामगिरी करता आली नाही. उपांत्य फेरीत पोहचण्याची या संघाची शक्यता धूसर असून हा संघ ही उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून जवळपास बाद झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने डळमळीत सुरुवात केली, मात्र आता हा संघ रुळावर आला असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा संघ प्रयत्नशील आहे. न्यूझीलंडनेही चांगली सुरुवात केली भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने हा संघ थोडा मागे फेकला गेला असला तरी उपांत्यफेरीत हा संघ पोहचू शकतो. दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत आहे. त्यांनी केवळ एकच सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांची उपांत्यफेरी निश्चित आहे. त्यांचे फलंदाज चांगल्याच फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यांचे गोलंदाज ही चांगली कामगिरी करत आहेत. उपांत्य फेरीत जर या संघाने माती खाल्ली नाही, तर हा संघ अंतिम फेरीत पोहचू शकतो. या स्पर्धेतील सर्वात जबरदस्त कामगिरी केली ती यजमान भारताने.
भारत या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करत आहे. भारताने खेळलेल्या सातच्या सात सामन्यात विजय मिळवत गुण तालीक्यात अव्वल स्थानी पोहचला आहे. विशेष म्हणजे सर्व सामने भारताने एकहाती जिंकले आहेत. भारताने या स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करून प्रतिस्पर्धी संघाला उधवस्थ केले आहे. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी करत आहे. भारताचे सर्वच फलंदाज फॉर्मात असून सर्वच फलंदाज धावा काढत आहेत. भारताच्या गोलंदाजांची तर अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे. बुमरा, सिराज, शामी, जडेजा, कुलदीप यादव हे भारताचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला खिंडार पाडत आहेत. भारताच्या गोलंदाजांनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी या स्पर्धेत केली आहे. या स्पर्धेत भारत जी अप्रतिम कामगिरी करत आहे ती भारतीय गोलंदाजांमुळेच कारण फलंदाज सामना जिंकून देतात तर गोलंदाज स्पर्धा जिंकून देतात. भारत ही विश्वचषक स्पर्धा सहज जिंकू शकतो कारण भारताचे गोलंदाज भन्नाट गोलंदाजी करत आहे. गोलंदाजांचा हा फॉर्म असाच कायम राहिला आणि फलंदाजांनी लौकिकाला साजेशी फलंदाजी केली तर भारत बारा वर्षानंतर पुन्हा विश्वविजय मिळवू शकतो यात शंका नाही.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.