बाबाजी महाराज हे तेज:पुंज योगी - धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज

    04-Nov-2023
Total Views |
- लोधीखेडा येथे भाऊसाहेब ग्रामस्थ जन्मशताब्दी महोत्सव

Dharmabhaskar Sadgurudas Maharaj 
 
नागपूर :
बाबाजी महाराज फार मोठे व्‍यक्तिमत्‍व होते. देश, धर्माबद्दल प्रेम असलेले बाबाजी महाराज हे तेज:पुंज योगी होते. त्‍यांच्‍यासारखे व्‍यक्तिमत्‍वाची लोधिखेडा ही कर्मभूमी होती. त्‍यांमुळे येथील लोक धन्‍य झाले आहेत, असे मत धर्मभास्‍कर सद्गुरूदास महाराज (Dharmabhaskar Sadgurudas Maharaj) यांनी शुक्रवारी व्‍यक्‍त केले.
 
श्री. स. ना. बाबाजी महाराज ग्रामस्थ आश्रम, लोधीखेडा यांच्यातर्फे 1 ते 4 नोव्हेंबर 2023 दरम्‍यान प.पू. भाऊसाहेब ग्रामस्थ जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज तिस-या दिवशी धर्मभास्‍कर सद्गुरुदास महाराज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थ‍ित होते.
 
ग्रामस्‍थ आश्रमात मागील तीन दिवसांपासून नित्यपूजा, काकड आरती, प्रातःस्मरण, प्रवचन, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी धर्मभास्कर प.पू. सद्गुरुदास महाराज यांच्या उपस्थितीत श्रीराम जयराम जयजयरामचा मंत्र स्वाहाकार करण्‍यात आला. मैथिली धानोरकर देशपांडे या मुलीने तुकाराम महाराजांचा ‘संत चरण रज लागता सहज’ हा अभंग सादर केला. सद्गुरूदास महाराजांनी मैथिलीचे कोतुक करताना त्‍याच अभंगावर निरुपण सादर केले.
 
बाबाजी महाराजांच्‍या आठवणींना उजाळा देताना सद्गुरूदास महाराज म्‍हणाले, बाबाजी महाराजांना प्रत्‍यक्ष पाहण्‍याचे भाग्‍य मला लाभले. त्‍यांची सावळी, ठेंगणी मूर्ती होती. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून त्‍यांची उपासना जाणवत असे. वासुदेवानंद सरस्‍वती सारख्‍या गुरूंच्‍या सान्निध्‍यात बाबाजी महाराज राहिल्‍यामुळे ते सद्गुरू पदाला पोहोचले, असे ते म्‍हणाले.
 
शनिवार, 4 रोजी 5 वाजता नित्यपूजेनंतर मंजूषा सराफ रचित भूपाळी पदे, सकाळी 8 वाजता देवनाथ मठाचे मठाधिपती आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव व पालखी, दुपारी 11 वाजता श्रीरामपंत जोशी यांचे कीर्तन व दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.