अमरावती : वेल्डिंग मशिनची ऑनलाइन खरेदी एका शासकीय 10 लाख 43 हजार 159 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या घटनेची तक्रार राजेंद्र धर्मासर (रा. कॅम्प परिसर) यांनी मंगळवार, 31 ऑक्टोबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात नोंदविली.
राजेंद्र धर्मासर यांनी 21 ऑक्टोंबर रोजी एका ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून 4 हजार 45 रुपये किमतीची वेल्डिंग मशिनची मागणी नोंदविली. या मशिनसाठी त्यांनी एका खासगी वित्तपुरवठा कंपनीच्या कार्डवर ईएमआय द्वारे लगेच पैसेदेखील भरले होते. त्यानुसार या मशिनचे पार्सल घेऊन कुरिअर कंपनीचा कर्मचारी 29 ऑक्टोंबर रोजी त्यांच्या घरी पोहोचला. त्याने त्यांच्या पत्नीला पार्सल देऊन ओटीपी क्रमांक विचारला. त्यावेळी त्याने राजेंद्र यांच्या मोबाइलवर कॉल केला. पण, ते त्यावेळी कार्यालयात एका बैठकीत होते. त्यामुळे ते मोबाइलवर संभाषण करू शकले नाहीत. अखेर कुरिअर कंपनीचा कर्मचारी पार्सल परत घेऊन गेला.
दरम्यान, राजेंद्र हे घरी परतल्यावर त्यांनी शॉपिंग ॲपवर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण, तक्रार नोंदविणे शक्य न झाल्याने त्यांनी कस्टमर केअरचा क्रमांक ऑनलाईन शोधला. त्यानंतर त्यांनी एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून मशिनबद्दल विचारणआ केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने मशिनसाठी दिलेली रक्कम परत मिळवून देऊ शकतो, अशी बतावणी केली. त्यानुसार त्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला बँकेचा खाते क्रमांक, एटीएम कार्ड चे सर्व तपशिल सांगितले. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यांनी लिंक उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 10 लाख 43 हजार 159 रुपये कपात झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात राजेंद्र यांनी सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात ठकसेनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.