अमरावती : घरफोडी व चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीतील दोन कुख्यात गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तप्रदेशातून अटक केली. तौसिफ खान वल्द सलिम खान (33, रा. बकरकसाब सिंकदराबाद, जि. बुलदंशहर) व रोहीत मंगुसिंग त्यागी (33, रा. गौतमबुध्द नगर, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील दोन व नांदगाव पेठ येथील एका, अशा तिन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून एका चारचाकी वाहन, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने व रोख असा एकुण 11 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणातील शाहनबाज वल्द इकराम (48, रा. बकरकसाब, सिंकदराबाद, जि. बुलंदशहर, उत्तरप्रदेश), इरशाद व सहानी नामक आरोपी पसार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी बुधवार, 1 नोव्हेंबर रोजी पत्रपरीषदेतून दिली. यावेळी पोलिस उपायुक्त सागर पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले व पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांची उपस्थिती होती.
शहरातील पटवारी कॉलनी स्थित शुभम अपार्टमेंटमधील रुपाली कानतोडे यांच्या घरातून चोराने सोन्याचे दागिने व रोख असा एकुण 1 लाख 52 हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. गाडगेनगर हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे पोलिस समांतर तपास करीत असताना, पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी निदर्शनास आले की, आरोपींनी या गुन्ह्यात एका महागड्या चारचाकी वाहनाचा वापर केला. या माहितीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती गोळा केली. दरम्यान नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावरील सिसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या चारचाकी वाहनावरून पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने तत्काळ दिल्ली रवाना होऊन तेथील पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या चौकशीनंतर त्यांनी त्यांच्या काही साथीदारांसह गाडगेनगर व नांदगाव पेठ हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. कारवाई करणा:या पथकाला 25 हजार रुपयांचा रिवार्ड देण्यात आला.
आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा
आरोपी हे नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करीत असताना, त्यांना एका व्यक्तीने पाहिले होते. त्यावेळी त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि त्यानंतर चोरी करून पळून गेले. त्यामुळे या गुन्ह्यात दरोडा टाकण्याच्या कलमान्वये वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीसह अनेक ठिकाणी गुन्हे
आरोपी एका महागड्या चारचाकी वाहनाने अमरावती आले आणि शहरातील एका लॉजमध्ये थांबले होते. त्यांनी एका स्थानिक व्यक्तीच्या मदतीने भर दिवसा चोरी केली. या आरोपींविरुध्द दिल्लीत घरफोडी, रॉबरी व फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा येथेही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.