वडिलांसमोरच मुलाची चाकूने भोसकून हत्या; चार आरोपींना अटक, एक पसार

    03-Nov-2023
Total Views |
  • वलगावातील अशोक नगर परिसरातील घटना
fatal-stabbing-leads-to-murder-in-valgaon - Abhijeet Bharat 
अमरावती : शिविगाळ केल्याच्या कारणावरून एका तरुणाची त्याच्या वडिलांसमोरच चाकूने भोसकून निर्घुण हत्या करण्यात आली. सचिन भारत गवई (25, रा. हातखेडा) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना 31 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास दरम्यान वलगावातील अशोक नगर स्थित बौध्द विहारजवळ घडली. या घटनेमुळे गावात तणावसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. परंतू पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केल्यानंतर तणावाचे वातावरण निवळले.
 
याप्रकरणात वलगाव पोलिसानी आरोपी नागेश दिपक पंडीत (25), गणेश दिपक पंडीत (20), साहिल अमर तसरे (21), रोहित रामसिंग सोळंके (18), अजय मेश्राम (22, सर्व रा. वलगाव) अशी आरोपींची नावे असून, याप्रकरणात दोन विधीसंघर्षीत बालकांचाही सहभाग आहे. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी मृतक सचिन गवई यांचे वडिल भारत विश्वास गवई (48, रा. हातखेडा, ता. भातकुली, जि. अमरावती) यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुध्द भादंविच्या कलम 302, 143, 148, 149, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
 
समजाविण्यासाठी जात असताना हल्ला
 
सचिन व एक आरोपी हे एकमेकांचे नातवाईक असून, फोनवर शिविगाळ केल्याच्या कारणावरून दोघांचा वाद सुरु झाला होता. दरम्यान सचिनने या वादाबद्दल आपल्या वडिलांना सांगितले. त्यानंतर सचिव व त्याचे वडिल भारत असे दोघेही दुचाकीने आरोपी असणा:या एका नातेवाईकाला समजावण्यासाठी वलगाव येथे जात होते. दरम्यान ते त्यांच्या नातेवाईकांच्या घरी जात असतांना आरोपितांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन सचिन व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली आणि मारहान केली. दरम्यान आरोपी नागेश पंडीत याने सचिनवर चाकुने वार करुन त्याला जिवानिशी ठार केले. असा आरोप सचिनच्या वडिलांनी पोलिस तक्रारीतून केला आहे.
 
बाल न्याय मंडळासमोर केले हजर
 
याप्रकरणात वलगाव पोलिसांनी आरोपी नागेश दिपक पंडीत, साहिल अमर तसरे, रोहित रामसिंग सोळंके व अजय मेश्राम यांना अटक केली असून, दोन विधी संघर्षीत बालक ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयासमक्ष तर विधी संघर्षीत बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.