२०२० ते २०२२ या दोन वर्षात कोरोना नामक विषाणूजन्य आजारापुढे संपूर्ण विश्व हतबल ठरले होते. कोरोनामुळे किती लोकांचा बळी गेला, किती कुटुंबे उध्वस्त झाली आणि कोरोनामुळे जग कसे बदलले हे ही आपण बघितले आहे. तब्बल दोन वर्ष कोरोनाने जगावर राज्य करून जग हादरवून सोडले. वैज्ञानिकांच्या महत्प्रयासाने कोरोनावरील लसीचा शोध लागला आणि जगातून कोरोना हद्दपार झाला. जगातून कोरोना हद्दपार झाल्याने गेले वर्ष - दीड वर्ष जगाने मोकळा श्वास घेतला. कोरोना हद्दपार झाल्याने आता कुठे जग पूर्वपदावर येत असतानाच चीन मधून पुन्हा एका नव्या विषाणूजन्य आजाराची बातमी आली आणि संपूर्ण जगामध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
हो चीनमध्ये सध्या एका नव्या विषाणूजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूजन्य आजाराने लहान मुलांना घेरले असून चीनमधील लहान मुलांना या विषाणूजन्य आजाराने श्वसनाचे विकार होत होते. ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांनी लहान मुले त्रस्त आहेत. या नव्या विषाणूजन्य आजाराने बीजिंग आणि त्याच्या पाचशे मैल परिसरातील सर्व रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरले आहेत. हा आजार रोखण्यासाठी या परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अर्थात कोरोना इतपत हा विषाणूजन्य आजार धोकेदायक नसला तरी जगाची चिंता वाढवणारा आहे, हे नक्की. त्यामुळेच जगातील सर्वच देशांनी याबाबत दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे.
भारतातही केंद्र सरकार आणि इंडियन मेडिकल कौन्सिल (आयएमसी) ने प्रत्येक राज्याला कारोना काळात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या विषाणूजन्य आजाराने अजून जीवितहानी झाल्याची बातमी नाही. ही दीलासाजनक बातमी असली तरी कोणीही या विषाणूजन्य आजाराला हलक्यात घेण्यास तयार नाही. कारण या विषाणूजन्य आजाराचे उगमस्थान हे चीन आहे. हो ज्या चीनमध्ये कोरोनाचा उगम झाला त्याच चीनमध्ये या नव्या विषाणूजन्य आजाराचा ही उगम झाला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केवळ हा किंवा कोरोनाच नाही तर स्वाईन फ्लू, बर्ड फ्ल्यू, झिका यासारखे विषाणूजन्य आजारही चीनमधूनच सर्व जगात पसरले. सर्व विषाणूजन्य आजार चीनमध्येच कसे उगम पावतात हा सर्व जगाला पडलेला प्रश्न आहे.
चीन हाच विषाणूजन्य आजाराचा उगमस्थान आहे. मात्र चीन हे मान्य करत नाही. अर्थात चीनच्या मानण्या न मानण्याने सत्य लपत नाही. कोरोना देखील आपले पाप नाही, अशीच भूमिका चीनने घेतली होती. मात्र नंतर सत्य उजेडात आलेच. चीनला जगावर राज्य करायचे आहे. अमेरिकेला मागे सारून जगातील सर्व सत्ताधीश महासत्ता व्हायचे आहे. त्यासाठी ते जैविक अस्त्राची निर्मिती करत आहेत, असा आरोप नेहमीच केला जातो. या जैविक अस्त्रांच्या निर्मितीतूनच अशा प्रकारचे विषाणूजन्य आजार निर्माण होत आहेत, असा आरोप अमेरिका आणि युरोप खंडातील शास्त्रज्ञांनी केला आहे. अर्थात चीनने हे नेहमीप्रमाणे नाकारले असेल तरी चीनमध्ये काय चालले हे जगाला समजत नाही. चीन जे काय करतो ते सर्व गुपचूप करतो आणि जो कोणी यावर आवाज उठवतो त्याला चीन ढगात पाठवतो. त्यामुळे चीनमधील अनेक गूढ गोष्टी जगापुढे येत नाहीत.
आता या नव्या विषाणूजन्य आजाराचे कारण ही चीन जगापुढे येऊ नये यासाठी आटापिटा करत आहे. मात्र यामुळे जगाची डोकेदुखी वाढत आहे. चीन कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जगाला वेठीस धरत आहे. महासत्ता होण्याच्या नादात चीन मानव जातच उध्वस्त करत नाही ना अशी ही शंका येऊ लागली आहे. म्हणूनच जगाने आता नव्या आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार राहायला हवे. प्रतिबंध हाच कोणत्याही आजारावर उपाय असतो हे लक्षात घेऊन नागरिकांनी आतापासूनच दक्ष राहावे.
श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.