राष्‍ट्रसंतांचा जाज्‍वल्‍य विचार नव्‍या पिढीपर्यंत पोहोचेल - नितीन गडकरी

28 Nov 2023 13:43:55
  • ‘राष्‍ट्रसंत तुकडोजी’ संकेतस्‍थळाचे विमोचन
nation-builders-tukdoji-maharaj-web-portal-launch - Abhijeet Bharat 
नागपूर : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अत‍िशय सोप्‍या शब्‍दात समाज सुधारणेचा, समाज कल्‍याणाचा आणि समाजाला समृद्ध करण्‍याचा मार्ग दाखवला. छोट्या छोट्या रचनांमधून त्यांनी प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्‍कार देण्‍याचे कार्य केले. त्याचे राष्‍ट्रभक्‍ती व समाज सुधारणेचे जाज्‍वल्‍य विचार नव्‍या पिढीपर्यंत पोहोचवण्‍याचे काम वेबसाईट करेल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केला. श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरतर्फे तयार करण्‍यात आलेल्‍या ‘राष्‍ट्रसंत तुकडोजी डॉट कॉम’ या वेबसाईचे नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या मंचावर विमोचन करण्‍यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 
राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने आणि संस्‍कार आजही विदर्भाच्‍या कानाकोपऱ्यात बघायला मिळतात. त्‍यांचे जीवन अमरावती ज‍िल्‍हा व विदर्भात व्‍यतीत झाले, हे आपले भाग्‍य आहे. वेबसाईटवर असलेली त्‍यांची भजने, भाषणे, प्रवचने आपल्‍याला ऐकायला मिळणार असून त्‍यामुळे मनावर संस्‍कार होण्‍यास मदत होईल, असे नितीन गडकरी म्‍हणाले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्‍यावतीने यावेळी नितीन गडकरी यांचा सत्‍कार करण्‍यात आला. वेबसाईटचे निर्माते नचिकेत अटरावलकर यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.
 
राष्‍ट्रसंतांची नागपूर ही कर्मभूमी राहिली असून त्‍यांच्‍या जीवनातील अनेक प्रसंग नागपूरशी निगडीत आहेत. राष्‍ट्रसंतांच्‍या विचारांनी प्र‍भावित असलेले नितीन गडकरी अत्‍यंत संवेदनशील व कृतिशील असून आमच्‍या विनंतीला मान देऊन त्‍यांनी राष्‍ट्रसंतांचे तत्‍वज्ञान व्‍यापक व्‍हावे, या उद्देशाने या वेबसाईटच्‍या निर्मितीमध्‍ये मोलाचे सहकार्य दिले, त्‍याबद्दल आम्‍ही त्‍यांचे आभारी आहोत, असे श्रीगुरुदेव सेवा मंडळ, नागपूरचे अध्‍यक्ष ॲड. अशोक यावले म्‍हणाले.
Powered By Sangraha 9.0