कलेचा विकास रसिकांच्‍या प्रतिसादावर अवलंबून

28 Nov 2023 13:54:03
  • ‘लोकमानसातील चित्रवैभव’ कार्यक्रमात कलाकारांचा सूर
lokmanas-chitravaibhav-art-exhibition-vidarbha - Abhijeet Bharat
 
नागपूर : लोकचित्रकलेचा प्रकार कुठलाही असो, याला लोकांचा प्रतिसाद लाभला तर ती कला समाजात टिकून राहते, असा सूर ‘लोकमानसातील चित्रवैभव’ या कार्यक्रमात उपस्थित कलाकारांद्वारे व्यक्त करण्‍यात आला. विदर्भ साहित्य संघाच्‍या ‘सर्जना निर्माण’ या मालिकेच्या दुसर्‍या सत्रातील तिसरे पुष्प ‘लोकमानसातील चित्रवैभव’ सोमवारी वि.सा. संघाच्या अमेय दालनात पार पडले. यात तीन चित्रकार प्रा. सदानंद चौधरी, प्रा. विनोद चव्हाण आणि प्रा. चंद्रकांत चन्ने यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर उपस्‍थ‍ित होते.
 
कालीघाट लोकचित्रांवर विवेचन करताना प्रा. विनोद चव्हाण म्हणाले, या कलेचा वापर सौंदर्य निर्माण करणे, तसेच अभिव्यक्त होण्यासाठी केला गेला आहे. कालीघाट लोककला 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात विकसित झाली होती. ही कला गायन व दृश्य या दोन्हीच्या माध्यमातून प्रस्तुत केली जात असे. धार्मिक व पौराणिक चित्र बनविली जात असे. त्यानंतर सामाजिक परिस्थितीवर सुद्धा चित्र काढली गेली. कोलकात्यातील कालिमातेच्या मंदिरात ही चित्रे आढळतात. ठळक रेषा, चित्र, नैसर्गिक गडद रंग, बोलके डोळे हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.
 
वारली चित्राकारीवर बोलताना प्रा. सदानंद चौधरी म्हणाले, महाराष्ट्रातील वारली जमातीची ही कला आता प्रत्येकाच्या घरी आणि जागतिक स्तरावर पोहोचलेली आहे आहे. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात ही कला सुरू झाली. सहज सुंदर दोन त्रिकोण एकत्र करून माणसाची प्रतिमा तयार करणे, भौमित‍िक पद्धतीने रेखाटली जाणारी अतिशय सोपी कला आहे. शेणामातीच्या भिंतींवर तांदळाच्या पिठाने हे चित्र आकर्षक पद्धतीने रंगविले जाते. या चित्रांमधून त्यांचे सण, उत्सवांचे दर्शन होते. आज कपड्यांवर मोठ्या प्रमाणात वारली डिझाईन दिसते. एकजूट आणि सदैव कामात राहावे हा भाव वारली पेंटिंगमधून व्यक्त होतो, असे ते म्हणाले.
 
मधुबनी चित्रकारी प्रा. चंद्रकांत चन्ने यांनी भाष्‍य केले. ते म्हणाले, मधुबनी पूर्वी मिथिला नगरीची चित्रकला म्हणून ओळखली जात असे. मधाचे जंगल असलेल्या मिथीला नगरीची ही शैली आहे. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त महिलाच करतात. रांगोळीपासून या शैलीची सुरुवात झाली. आधी जमीनीवर काढली जाणारी ही शैली नंतर भिंतीवर काढली जायला लागली. यात रामायणातील दृश्य रंगविले जातात. मिथीलाच्या स्टेशनचे संपूर्ण सौंदर्यीकरण महिलांनी या मधुबनी चित्रांनी केले. ही कला साकारणार्‍या 9 महिलांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. रेषाभान हे याचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मंगेश बावसे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0