सुनीती देवांचे व्यक्तिमत्व होते चैतन्याचा कारंजा - प्रभा गणोरकर

27 Nov 2023 13:16:17
  • डॉ. सुनिती देव यांच्या दोन पुस्तकांचा भावपूर्ण प्रकाशन सोहळा संपन्न
sunithi-dev-literary-event-book-launch - Abhijeet Bharat 
नागपूर : स्विकारणे, समंजसपणा, नको ते दूर सारणे, जे जे काही सुंदर आहे ते घेणे हा सुनीती देव यांचा स्वभाव. सर्व कार्यक्रमांमध्ये त्या चैतन्याने सहभागी व्हायच्या. त्यांचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने चैतन्याचा कारंजा होते, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांनी काढले. ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, तत्त्वज्ञान विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका स्व. डॉ. सुनिती देव यांच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील अमेय दालनात संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. 'विवेकाच्या गोठी' हा वैचारिक लेख संग्रह आणि 'एकसारखी नसती दोन' या दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते यावेळी झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रभा गणोरकर, तसेच महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते.
 
गणोरकर पुढे म्हणाल्या की सुनीती देव यांनी भरपूर मित्र जोडले.त्यांच्या लेखनात कार्यकर्तेपणा, सामाजिक समतेचे संस्कार होते, सगळ्यांचा विचार करण्याची वृत्ती त्यांची होती. 'विवेकाची गोठी' पुस्तक वाचून हे कळते. विवेक जागृत ठेऊन केलेले लिखाण यातून दिसून येते, असे प्रांजळ मत देखील प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या मैत्रीच्या काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
 
श्रीपाद अपराजित यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सुनीती देव हे एक निखळ व्यक्तिमत्व होते. माणुसकीवर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तींपैकी त्या होत्या. कुठलाही बडेजाव न करता जीवनाचा आनंद कसा घेता येईल यावर त्या अधिक लक्ष केंद्रित करत. प्रखर मत मांड्ताना त्यांनी कधीही कच खाल्ला नाही. आपण अनेक बाबतीत त्यांचे मार्गदर्श घ्यायचो असे सांगून त्यांचा वक्तशीरपणा शिकण्यासारखा होता असे अपराजित म्हणाले. मोकळेपणाने परंतु भान ठेऊन केलेले लिखाण पुस्तकात दिसून येते असे ते म्हणाले.
समारोपीय अध्यक्षिय भाषण विसा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली देशपांडे यांनी केले. आज सुनीती देव यांचा वाढदिवस असून पुस्तक प्रकाशित करण्याचे औचित्य त्यांनी विशद केले. डॉ. रजनी हुद्दा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मुखपृष्ठ निर्मितीसाठी सुनील यावलीकर यांचा सत्कार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आला तर पुस्तक निर्मिती मध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल प्रफुल्ल शिलेदार यांचा सत्कार प्रभा गणोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
 
पोकळी जाणवेल - महेश एलकुंचवार
 
सूनिती देव आणि माझ्या वयात बराच फरक होता. तरीही त्यांच्या सोबत झालेल्या अनेक विषयांवरील चर्चा कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याची खंत महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केली. देव यांचे व्यक्तिमत्व निखळ, सुंदर, स्वच्छ मनाचे होते. त्या स्पष्ट वक्त्या होत्या तरीही दुखावणारी भाषा त्या बोलत नसत असे ते म्हणाले. या पुस्तकांच्या माध्यमाने सुनीती देव कायम स्मरणात राह्तील असे उद्गार त्यांनी काढले.
Powered By Sangraha 9.0